गेल्या तीन दशकांहून अधिक काळ देशातील इमारतींची वेगळी आखणी करणारे..  गगनचुंबी इमारतींची निर्मिती करून मुंबईचे रुपडे पालटणारे.. डिझाईन क्षेत्रातील प्रकल्पांच्या माध्यमातून देशातील पायाभूत सुविधांना चालना देणारे.. वास्तुविशारद क्षेत्रातील मूलभूत कार्याबद्दल ‘पद्मभूषण’ने गौरविण्यात आलेले ज्येष्ठ वास्तुविशारद हफीझ कॉन्ट्रॅक्टर यांच्याशी ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे शनिवारी (१६ एप्रिल) चित्ररूप संवाद साधणार आहेत.
वाईड अँगल फोरम, पुणे आणि रवी परांजपे स्टुडिओ यांनी हा योग जुळवून आणला आहे. मॉडेल कॉलनी येथील परांजपे यांच्या निवासस्थानी साकारलेल्या रवी परांजपे स्टुडिओ येथे सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. वास्तुविशारदाचा पद्मभूषण पुरस्काराने गौरव झाल्याबद्दल रवी परांजपे यांच्या हस्ते हफीझ कॉन्ट्रॅक्टर यांना ‘वास्तु रत्न पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येणार आहे.
रवी परांजपे यांची ख्याती एक सुविद्य चित्रकार म्हणून आहेच. पण, मुंबईच्या वास्तव्यात त्यांचा अनेक वास्तुविशारदांबरोबर ‘आर्किटेक्चरल रेन्डिरग्ज’साठी संबंध आला. त्यातील एक नाव म्हणजे हफीझ कॉन्ट्रॅक्टर. कॉन्ट्रॅक्टर यांच्यासाठी परांजपे यांनी चितारलेली अनेक वास्तुचित्रे आजही परांजपे यांच्या संग्रहामध्ये जपून ठेवण्यात आली आहे. हे औचित्य साधून परांजपे यांनी खास कॉन्ट्रॅक्टर यांच्यासाठी केलेल्या वास्तुचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. रविवारपासून (१७ एप्रिल) ते १ मे पर्यंत हे प्रदर्शन सर्वासाठी खुले राहणार आहे.
पुण्यातील आर्किटेक्ट, इंटिरिअर डिझायनर आणि अन्य डिझायनर यांनी एकत्र येऊन ‘वाईड अँगल फोरम’ ही संस्था स्थापन केली आहे. या संस्थेतर्फे वर्षांतून वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे विचारांचे आदानप्रदान व्हावे यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे. हा कार्यक्रम म्हणजे डिझाईन क्षेत्रातील व्यावसायिक आणि विद्यार्थी यांच्यासाठी मोठय़ा वास्तुविशारदाची भेट घेण्याची सुवर्णसंधीच आहे. वाईड अँगल फोरमच्या संस्थापिका प्रिया गोखले आणि नवोदित वास्तुविशारद सलिल सावरकर हे हफीझ कॉन्ट्रॅक्टर यांची मुलाखत घेणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dialogue of ravi paranjpe with hafiz contractor
First published on: 14-04-2016 at 03:23 IST