पुण्याच्या डायना पंडोलेचे नाव इतिहासात कोरलं जाणार यात शंकाच नाही कारण डायना पंडोले ही महिला आता फेरारी रेसमध्ये उतरणार आहे. फेरारी रेसमध्ये उतरणारी पहिली महिला असा तिचा लौकिक आहे. कोण आहे डायना पंडोले? जाणून घेऊया तिच्याबाबत.
डायना पंडोले कोण आहे?
डायना पंडोले ही महिला फेरारी क्लब चॅलेंज मिडल ईस्ट या आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी सज्ज झालीआहे. दरम्यान या अगोदर डायना या स्पर्धेचा भाग म्हणून मध्य-पूर्व राष्ट्रांतील दुबई, अबू धाबी, बहारिन, कतार आणि सौदी अरेबियातील प्रसिद्ध ट्रॅकवर सहभाग घेणार आहे. फेरारी रेसमध्ये भाग घेणारी ती पहिली पुणेकर आणि भारतीय महिला ठरली आहे.

डायनाची रेसिंगची सुरुवात नेमकी कशी झाली?
डायनाची रेसिंगची सुरुवात २०१८ मध्ये जेके टायर वुमन इन मोटरस्पोर्ट प्रोग्रॅमने झाली. सुरुवातीपासूनच तिने अनेक रेसमध्ये सहभागी होऊन सर्वांचे लक्ष वेधले. ऑगस्ट २०२४ मध्ये मद्रास इंटरनॅशनल सर्किटवर एमआरएफ इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिप – सॅलून कॅटेगरीत तिने विजेतेपद मिळवणारी पहिली भारतीय महिला ठरली. मुगेलो, मोन्झा आणि दुबई ऑटोड्रोमसारख्या आंतरराष्ट्रीय ट्रॅक्सवर तिने कठोर प्रशिक्षण घेतले. यानंतर आता ती जागतिक स्तरावर आपला खेळ दाखवण्यास सज्ज झाली आहे. वडिलांच्या प्रोत्साहन दिल्याने कार रेसिंगची आवड जागृत झाल्याचं डायनाने सांगितलं.
डायना फेरारी २९६ चॅलेंज कारने ट्रॅकवर उतरणार आहे
डायना फेरारी २९६ चॅलेंज कारने ट्रॅकवर उतरणार आहे. जी कंपनीच्या सर्वाधिक अॅडव्हान्स रेस मॉडेल्सपैकी एक आहे. या ६७० हॉर्सपॉवरच्या मशीनला तीक्ष्ण हँडलिंग आणि २५० किमी/तासपेक्षा जास्त वेगासाठी ओळखले जाते. ही कार रोड-गोइंग २९६ जीटीबीवर आधारित आहे. याचा पहिला राऊंड ८-९ नोव्हेंबर २०२५ ला अबू धाबीच्या यास मरीना सर्किटवर होईल. यावेळी डायनाचा सामना थे जागतिक स्पर्धकांशी होणार आहे.
डायना पंडोले ३२ वर्षीय रेसर
डायना पंडोले या पुण्यातील ३२ वर्षीय रेसर आहेत. त्या पहिल्या भारतीय महिला म्हणून फेरारी २९६ चॅलेंज कार चालवून मध्य पूर्वेकडील फेरारी क्लब चॅलेंज स्पर्धेत (नोव्हेंबर २०२५ ते एप्रिल २०२६) भाग घेणार आहेत. ही स्पर्धा दुबई, अबू धाबी, बहरीन, कतार आणि सौदी अरबमधील फॉर्म्युला वन सर्किट्सवर होईल. डायनाच्या या मोहिमेला अलाइन्ड ऑटोमेशन आणि फेरारी न्यू दिल्लीकडून प्रायोजकत्व मिळालं आहे. ही स्पर्धा वेग, अचूकता आणि सहनशक्तीचा कस लावणारी असते. डायनाच्या सहभागाने भारतीय मोटरस्पोर्टला अधिक समावेशक आणि प्रेरणादायी भविष्य मिळेल, असा विश्वास व्यक्त होतो आहे.
