पुणे : मोसमी पावसाने ओढ दिल्यामुळे खरीप पेरण्यांना मोठा फटका बसला आहे. मका आणि सोयाबीन वगळता अन्य पिकांची पेरणी दहा टक्क्यांच्या आतच आहे. मूग, उडीद, मटकी, चवळी या कडधान्यांची पेरणी जूनअखेर केली तरच चांगले उत्पादन हाती येण्याची शक्यता असते. सात जुलैनंतर आकस्मिक परिस्थिती निर्माण होऊन तशी उपाययोजना करावी लागते. त्यामुळे सात जुलैअखेर पाऊस सुरू न झाल्यास खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादकतेवर मोठा परिणाम होणार आहे.

कडधान्यांची पेरणी जूनअखेर न झाल्यास काढणीच्या वेळी ही पिके परतीच्या मोसमी पावसात सापडून मोठे नुकसान होते. त्या शिवाय रब्बी ज्वारीसाठी शेत मोकळे होत नाही, त्यामुळे शेतकरी कडधान्य पिकांची पेरणी उशिराने करणे टाळतात. त्या ऐवजी शेतकरी सोयीनुसार रांगडा कांदा, ऊस, रब्बी ज्वारी, चारा पिकांना प्राधान्य देतात. त्यामुळे सात जुलैअखेर पाऊस न सुरू झाल्यास एकूण खरीप हंगामाच्या उत्पादकतेवर मोठा परिणाम होणार आहे. मागील काही वर्षांपासून उशिराने मोसमी पाऊस सुरू होत असल्यामुळे सोयाबीन, तूर पेरण्या जुलैअखेपर्यंत होताना दिसतात. मागील वर्षी भाताची लागण ऑगस्ट महिन्यातही सुरू होती. पण, उशिराने पेरणी झाली की, हमखास उत्पादन मिळण्याची खात्री कमी होते. पण, शेतशिवारे मोकळी पडून राहिल्यापेक्षा काहीतरी हाती येईल म्हणून शेतकरी पेरणी करतात.

पेरणीचा केवळ श्रीगणेशा..

मोसमी पाऊस लांबल्याचा अत्यंत प्रतिकूल परिणाम खरीप पेरण्यांवर झाला आहे. यंदाच्या खरीप हंगामातील पेरण्यांचा केवळ श्रीगणेशाच झाला आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार २७ जूनअखेर सरासरीच्या तुलनेत तृणधान्यांपैकी भाताची पाच टक्के, खरीप ज्वारी एक टक्का, बाजरी सहा टक्के, रागी तीन टक्के आणि मक्याची दहा टक्के पेरणी झाली आहे. सह्याद्री घाट परिसरात पाऊस सुरू न झाल्यामुळे राजगिरा, कोडू, कोद्रा, कुटकी, वरई, बार्टी, सावा, राळा, नाचणी यांची पेरणी दोन टक्केच झाली आहे. तृणधान्यांची एकूण पेरणी सहा टक्के झाली आहे. कडधान्य पिकांची पेरणी सरासरीच्या सात टक्के झाली आहे. त्यात तूर आठ टक्के, मुग सहा टक्के, उडीद सात टक्के,  इतर कडधान्यांची (कुळीथ, चवळी, मटकी, राजमा) तीन टक्के पेरणी झाली आहे. तेलबियांची पेरणी सरासरीच्या दहा टक्के झाली आहे. त्यात भुईमूग  सहा टक्के, सूर्यफूल नऊ टक्के. सोयाबीन दहा टक्के, तर तीळ, कारळची पेरणीच होऊ शकली नाही. 

राज्यभरात आता पावसाळी वातावरण निर्माण होऊ लागलेले आहे. जुलैच्या पहिल्या आठवडय़ात पेरण्यांना चांगला वेग येण्याची शक्यता आहे. कडधान्यांची पेरणी सरासरीच्या ६० टक्क्यांपर्यंत होण्याचा अंदाज आहे. तूर, सोयाबीन, कापसाची पेरणी १५ जुलैपर्यंत करता येईल. मूग, उडीद, मटकी, चवळी खालील क्षेत्र तूर, बाजरी, सूर्यफूल, सोयाबीनकडे वळण्याची शक्यता आहे.

– विकास पाटील, कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण)