अलीकडील काही दिवसांपासून नृत्यांगणा गौतमी पाटील हीच्या आडनावावरून राजकारण तापलं आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते-पाटील आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यात वाद रंगल्याचं पाहायला मिळत आहे. दिलीप मोहिते-पाटील यांनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांची तुलना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी केली होती. याला आढळराव-पाटील यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.

मोहिते-पाटील काय म्हणाले?

“गौतमी पाटीलला का ट्रोल केलं जातंय, हे मला कळत नाही. नवीन कलाकार असल्यानं तिचं आयुष्य एवढ्या लवकर संपवू नका. गौतमी अत्यंत गरीब परिस्थितून कलेच्या माध्यमाने लोकांना कळली आहे. पिंपरीचे पोलीस तिच्या कार्यक्रमावर बंदी घालतात. कारण, तिच्यामुळे कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पण, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा एवढी गर्दी जमत नाही, तेवढी गौतमीच्या कार्यक्रमाला जमते,” असा विधान दिलीप मोहिते-पाटील यांनी केलं होतं.

हेही वाचा : कुस्तीपटूंच्या आंदोलनावरून खासदार प्रीतम मुंडे यांचा भाजपाला घरचा आहेर, म्हणाल्या…

“कोणावरही तोंडसुख घेणं आणि आरोप करणं ही…”

याला माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ” दिलीप मोहिते हे वादग्रस्त विधाने करणारे अज्ञानी आमदार आहेत, असं समजतो. ते वेढ्याच्या नंदवनात जगत असतात. कोणावरही तोंडसुख घेणं आणि आरोप करणं ही त्यांची जुनी सवय आहे. मुख्यमंत्र्यांची तुलना गौतमी पाटीलबरोबर करणं शोभत नाही. मुख्यमंत्र्यांबद्दल अशी विधान करणं महाराष्ट्रातील जनता कदापीही सहन करणार नाही,” असं आढळराव पाटील यांनी म्हटलं आहे.

पाटील आडनावावरून वाद

दरम्यान, गौतमी पाटील हीच्या आडनावावरून वाद झाला होता. “गौतमीचे खरे आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. पाटील आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करतेय. गौतमीने पाटील हे आडनाव लावू नये. अन्यथा महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही,” असा थेट इशारा मराठा समन्वयकचे राजेंद्र जऱ्हाड पाटील यांनी दिला होता.

हेही वाचा : “जर कुस्तीपटूंना योग्य न्याय नाही मिळाला, तर…”, राज ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावर गौतमी पाटीलनेही उत्तर दिलं होतं. “कोण काय बोलतयं याने मला काही फरक पडत नाही. मी माझे काम करत राहणार. मी पाटील आहे आणि पाटीलच नाव लावणार,” असं गौतमी पाटीलने सांगितलं होतं.