शहराच्या विविध भागात महानगरपालिकेतर्फे वॉर्डस्तरीय निधीतून दिशादर्शक फलक उभारण्यात आलेले आहेत. मात्र, हे फलक नेमके कसे असावेत, कुठे लावावेत याबाबत स्पष्टता नसल्याचे पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी तर जुने फलक सुस्थितीत असतानाही त्यांच्या शेजारी तशीच माहिती असलेले फलक नवे फलक लावण्यात आले आहेत. अशा प्रकारच्या कारभारामुळे पुणेकरांच्या निधीचा अपव्यय होत असल्याचा आरोप पीपल्स युनियनतर्फे करण्यात आला आहे. त्याचबरोबर दिशादर्शक फलकांची जागा, त्यांचा आकार, रंग, त्यावरील मसुदा इत्यादी बाबींच्या आधारावर योग्य धोरण निश्चित करावे, अशी मागणी या संघटनेने केली आहे.
दिशादर्शक फलकांचे नियोजन पुणे महानगरपालिकेतर्फे अयोग्य पद्धतीने करण्यात आले आहे. असे पीपल्स युनियनचे संयोजक अॅड. रमेश धर्मावत यांनी सांगितले. खासगी सोसायटय़ांच्या नावाच्या मोठय़ा कमानी उभारल्या असतानाही कमानी शेजारी नावाचे फलक लावण्यात येत आहेत. तसेच शहरामध्ये विविध ठिकाणी निळ्या, हिरव्या, भगव्या अशा विविध रंगांचे दिशादर्शक लावण्यात आले आहेत. यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. तीन-चार दिशादर्शक फलक एकत्र फुटपाथवर असल्याकारणाने पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. फुटपाथच्या बाहेर काही फलक रस्त्यावर आल्यामुळे ट्रक, डंपर यांची धडक होऊन अपघात होण्याचीही शक्यता आहे. असे विविध मुद्दे पीपल्स युनियन तर्फे मांडण्यात आले आहेत.
या विविध मुद्यांच्या आधावर दिशानिर्देशक फलकांसाठी योग्य कार्यवाही करण्यात यावी आणि या बाबत एक प्रमाणित धोरण निश्चित करण्यात यावे, अशी मागणी पीपल्स युनियन तर्फे पुणे महानगपालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे करण्यात आली. यावेळी युनियनचे विनय ढेरे, रोहित पवार, समीर शेख, नितीन दुधनकर आदी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 11th Aug 2015 रोजी प्रकाशित
पुण्यातील दिशादर्शक फलक.. कसेही अन् कुठेही!
काही ठिकाणी तर जुने फलक सुस्थितीत असतानाही त्यांच्या शेजारी तशीच माहिती असलेले फलक नवे फलक लावण्यात आले आहेत.

First published on: 11-08-2015 at 03:10 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Directives pmc board peoples union