सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या खानावळीमध्ये पैसे भरल्याची पावती मागितली म्हणून खानावळीत जेवणच नाकारले जात असल्याची तक्रार विद्यापीठातील एका अपंग विद्यार्थ्यांने केली आहे. याबाबत मानवाधिकार आयोगाकडेही तक्रार करण्यात आली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या खानावळीत २५ रुपयांमध्ये विद्यार्थ्यांना जेवण मिळते. दिवसाला विद्यापीठातील हजारो विद्यार्थी जेवत असतात. खासगी कंत्राटदाराकडून खानावळ चालवली जाते. खानावळीच्या जेवणाचे पैसे दिल्यानंतर त्याची पावती मागितली म्हणून त्या विद्यार्थ्यांला जेवणच नाकारण्याचा प्रकार खानावळीत घडल्याची तक्रार या विद्यार्थ्यांने केली आहे. याबाबत विद्यापीठ प्रशासन, कुलसचिव आणि मानवाधिकार आयोगाकडे या विद्यार्थ्यांने तक्रार केली आहे.
विद्यापीठाच्या संस्कृत भाषा विभागात धोंडिबा हनमंते हे शिक्षण घेतात. त्यांनी विद्यापीठाच्या खानावळीत २५ रुपये भरून मासिक जेवणाचा अर्ज घेतला. त्यावेळी दिलेल्या रकमेची पावती हनमंते यांनी खानवळीच्या व्यवस्थापकाकडे मागितली. मात्र, व्यवस्थापकाने पावती देण्यास नकार दिला. त्यानंतर जेवण पाहिजे असेल, तर भोजनगृहाच्या सल्लागार समितीच्या अध्यक्षांकडून पत्र आणावे लागेल, असे उत्तर हनमंते यांना मिळाले. विद्यापीठाच्या अनेक इमारती, खानावळ यामध्ये अपंगांसाठी आवश्यक सुविधा मिळत नसल्याची तक्रारही हनमंते यांनी केली आहे.
याबाबत हनमंते यांनी सांगितले, ‘व्यवस्थापकाने परवानगीपत्र मागितले म्हणून विद्यापीठाच्या सल्लागार समितीकडे पत्र मिळावे, यासाठी ऑगस्ट महिन्यात अर्ज केला. मात्र, त्यांना पत्राचे उत्तर मिळाले नाही. त्यानंतर सप्टेंबरमध्ये कुलगुरू कार्यालयाकडे याबाबत अर्ज केला. रोज बाहेरच्या एखाद्या हॉटेलमध्ये जेवण घेण्याइतकी माझी परिस्थिती नाही. विद्यापीठाच्या खानावळीत पैसे देऊन जेवण मिळावे यासाठीच मी अर्ज केले होते. मात्र, मी खर्च केलेल्या पैशाची पावती मला मिळावी, अशी माझी मागणी आहे. मात्र, माझ्या एकाही अर्जाचे उत्तर मिळाले नाही. विद्यापीठ मला माझ्या मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवत आहे, त्यामुळे मी राज्यपाल आणि मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली आहे.’
‘‘विद्यापीठाच्या खानावळीत रोज हजारो विद्यार्थी जेवतात. मात्र, त्या विद्यार्थ्यांची अशी कधीच काही तक्रार आली नाही. विद्यापीठाच्या खानावळीचे जेवण कुणालाही नाकारण्यात आलेले नाही. विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखलही वेळोवेळी घेतली जाते. अपंग विद्यार्थ्यांनाही विद्यापीठ सर्वतोपरी सहकार्य करत असते. ज्या विद्यार्थ्यांने तक्रार केली आहे, त्याचे काही वैयक्तिक कारण असू शकेल, याबाबत माहिती घेतली जाईल.’’
– डॉ. नरेंद्र कडू, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ