पु. ल. देशपांडे लिखित ‘म्हैस’ या कथेच्या चालू असलेल्या स्वामित्व हक्काच्या दाव्यामध्ये पु.ल. देशपांडे यांचे नातेवाईक श्रद्धानंद ठाकूर आणि जयंत देशपांडे यांना प्रतिवादी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यांना ११ फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर राहण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
 पु.ल.देशपांडे लिखित ‘म्हैस’ या कथेच्या हक्कासंदर्भात गेल्या दोन वर्षांपासून शिवाजीनगर न्यायालयात खटला सुरू आहे. पुलंचे नातेवाईक श्रद्धानंद ठाकूर आणि जयंत देशपांडे यांनी ‘चांदी’ चित्रपटाचे निर्माते ज्ञानेश गोवेकर यांना चित्रपटासाठी ना-हरकत प्रमाणपत्र दिले होते. देशपांडे यांनी दिलेल्या ना-हरकत पत्रात पुलंच्या पत्नी सुनीताबाई देशपांडे यांच्या मृत्युपत्रातील केलेल्या उल्लेखानुसार पु.ल.देशपांडे यांच्या साहित्याचे सर्व हक्क खुले आहेत, असे म्हटले आहे. निर्माता दिग्दर्शक शेखर नाईक यांनी ‘म्हैस’ कथेचे हक्क विकत घेतल्यानंतरही या कथेवर ‘चांदी’ चित्रपट काढला होता. त्यामुळे स्वामित्व हक्काबाबात नाईक यांनी शिवाजीनगर न्यायालयात देवदत्त कपाडिया, श्री विद्या प्रकाशन, ज्ञानेश गोवेकर, लोकमान्य सेवा संघ पार्ले यांच्याविरुद्ध दावा दाखल केला आहे. यामध्ये ना-हरकत प्रमाणपत्र देणारे पुलंचे नातेवाईक ठाकूर आणि देशपांडे यांना प्रतिवादी करण्याची  मागणी त्यांनी केली होती. ती न्यायालयाने मान्य केली असून त्यांना ११ फेब्रुवारीस न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या खटल्यात आता एकूण सहा प्रतिवादी झाले आहेत, असे शेखर नाईक यांनी सांगितले.