शिवदर्शनमधील तावरे कॉलनी येथील शाळेसाठी आरक्षित असलेला तब्बल दीड लाख चौरस फुटांचा भूखंड एका बिल्डरला देण्याच्या विषयावरून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये जोरदार जुंपली असून या प्रस्तावाला कोणत्याही परिस्थितीत विरोध केला जाईल, असे सोमवारी काँग्रेसने जाहीर केले.
हा भूखंड बिल्डरला मिळावा यासाठी राष्ट्रवादीकडून जोरदार प्रयत्न सुरू असल्याचा आरोप काँग्रेसने केला असून मंगळवारी होत असलेल्या मुख्य सभेत हा प्रस्ताव दाखल करून घेण्यासाठी आल्यास त्याला विरोध केला जाईल, असे विरोधी पक्षनेता व काँग्रेसचे गटनेता अरविंद शिंदे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. ही जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिका आयुक्तांनी यापूर्वीच कार्यवाही सुरू केली असली, तरी आयुक्तांनी सुरू केलेली कार्यवाही थांबवण्याचीही तयारी राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे.
मित्रमंडळ सोसायटी ते तावरे कॉलनी दरम्यानच्या रस्त्यालगत पर्वती सर्वेक्षण क्रमांक ४७ (भाग) येथील दीड लाख चौरस फूट जागेवर प्राथमिक व माध्यमिक शाळेचे आरक्षण आहे. शहरासाठी तयार करण्यात आलेल्या १९८७ च्या विकास आराखडय़ात शाळेसाठी हे आरक्षण प्रस्तावित करण्यात आले असून ही जागा ताब्यात घेण्यासाठीची कार्यवाही महापालिकेने सप्टेंबर महिन्यात सुरू केली आहे. त्यासाठी १० कोटी ४० लाख २६,४१३ रुपये पालिकेने भूसंपादन विभागाकडे भरले आहेत.
संबंधित जागेवर आरक्षणांची अदलाबदल करून जागेवर झोपडपट्टी विकास योजना राबवावी, असा ठराव राष्ट्रवादीने केला आहे. मात्र, या ठरावावर आयुक्तांनी स्पष्टपणे प्रतिकूल अभिप्राय दिला असून ही जागा महापालिकेला अत्यंत आवश्यक असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. तसेच जागा संपादनासाठीची संयुक्त मोजणी देखील झालेली असून या जागेवरील झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रस्ताव मान्य करू नये, असे पत्रही महापालिकेने एसआरएला दिले आहे.
राजगुरू यांचा राजीनाम्याचा इशारा
भूसंपादनाच्या प्रक्रियेला खीळ घालण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी करत असून एका बिल्डरच्या ताब्यात हा भूखंड जावा यासाठीच प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप काँग्रेसचे नगरसेवक आबा बागूल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, शहर सुधारणा समितीमधील ठराव तातडीने मुख्य सभेकडे पाठवण्यासाठी समितीच्या अध्यक्षा, काँग्रेसच्या लता राजगुरू यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने केला, असाही आरोप काँग्रेसने केला आहे. अध्यक्ष म्हणून मला असलेले हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा प्रकार न थांबल्यास मला अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागेल, असा इशारा देणारे पत्र राजगुरू यांनी नगरसचिवांना सोमवारी दिले.
तज्ज्ञांची समिती नेमा – जगताप
या वादाबाबत प्रतिक्रिया देताना सभागृहनेता सुभाष जगताप म्हणाले, की संबंधित प्रस्तावामुळे महापालिकेचे नुकसान होणार आहे असे आमचे मत आहे. त्याबाबत प्रशासनाचे वेगळे मत असल्याने या वादाबाबत तज्ज्ञांची समिती नेमली जावी व समितीनेच भूसंपादनाबाबत निर्णय द्यावा.
संग्रहित लेख, दिनांक 19th Nov 2013 रोजी प्रकाशित
आरक्षित भूखंड बिल्डरला; काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये मोठा वाद
शिवदर्शनमधील तावरे कॉलनी येथील शाळेसाठी आरक्षित असलेला तब्बल दीड लाख चौरस फुटांचा भूखंड एका बिल्डरला देण्याच्या विषयावरून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये जोरदार जुंपली.

First published on: 19-11-2013 at 03:00 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dispute between cong rashreawadi on issue of reserved land for school at taware colony