महापालिकेच्या आठशे बचत गटांमधील महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन आणि दिवाळी फराळ विक्रीचा उपक्रम सोमवार (२१ ऑक्टोबर) पासून सुरू होत असून यंदा शहरात पाच ठिकाणी ‘दिवाळी बचत बाजार’ चे आयोजन करण्यात आले आहे.
महिला सक्षमीकरणांतर्गत महापालिकेतर्फे विविध उपक्रम राबवले जातात. याच उपक्रमात दरवर्षी दिवाळी बचत बाजाराचे आयोजन केले जाते. महापालिकेने निवडलेल्या आठशे गटांमधील महिला यंदा या उपक्रमात सहभागी होत असून या निमित्ताने लागणाऱ्या सर्व सुविधा पालिकेतर्फे उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती नागरवस्ती विभागाचे प्रमुख हनुमंत नाझीरकर यांनी शनिवारी दिली.
सजावटीच्या विविध वस्तू, शोभेच्या वस्तू, तोरण, घरगुती वापरातील वस्तू, कार्यालयीन कामकाजासाठी लागणाऱ्या वस्तू, लहान मुलांचे कपडे, स्वेटर, खेळणी, पणत्या, उटणे, रांगोळी, रांगोळीचे रंग, आकाशकंदिल, आयुर्वेदिक उत्पादने, विविध प्रकारचे खाद्यपदार्थ आणि दिवाळीचा फराळ आदींची विक्री या दिवाळी बचत बाजारामध्ये केली जाणार आहे.
बचत बाजारांचे दिनांक व वेळा पुढीलप्रमाणे
गणेश कला क्रीडा मंच (२१ ते २४ ऑक्टोबर, सकाळी अकरा ते रात्री नऊ), यशवंतराव चव्हाण, नाटय़गृह, कोथरूड (२५ ते २९ ऑक्टोबर, सकाळी अकरा ते रात्री नऊ), पु. ल. देशपांडे उद्यान, सिंहगड रस्ता (२५ ते २९ ऑक्टोबर, सकाळी अकरा ते रात्री नऊ), झेन्सार कंपनी शेजारील मैदान खराडी (२५ ते २९ ऑक्टोबर, दुपारी दोन ते रात्री नऊ) आणि सदाशिव देवकर जलतरण तलाव, परुळेकर विद्यालयाशेजारी, विश्रांतवाडी (२५ ते २९ ऑक्टोबर, दुपारी दोन ते रात्री नऊ). पाचही ठिकाणी प्रवेश विनामूल्य असून पार्किंगही नि:शुल्क उपलब्ध असेल.
संग्रहित लेख, दिनांक 20th Oct 2013 रोजी प्रकाशित
महापालिकेतर्फे यंदा पाच ठिकाणी ‘दिवाळी बचत बाजार’ चे आयोजन
महिला सक्षमीकरणांतर्गत महापालिकेतर्फे विविध उपक्रम राबवले जातात. याच उपक्रमात दरवर्षी दिवाळी बचत बाजाराचे आयोजन केले जाते.

First published on: 20-10-2013 at 02:36 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali bachat bajar by pmc