२१ ऑक्टोबर आणि पूर्वीही रेल्वे गाडय़ांचे आरक्षण

मुलांना शाळेला सुटी लागली की दिवाळी साजरी करण्यासाठी मूळ गावी जाण्याची लगबग सुरू होते. यंदा याच कालावधीत विधानसभेचे मतदान आहे. मात्र, रेल्वे आणि खासगी गाडय़ांसाठी दिवाळीसाठी नेहमीप्रमाणे आरक्षण सुरू आहे. मतदानाचा दिवस असलेल्या २१ ऑक्टोबर आणि त्यापूर्वीही रेल्वे गाडय़ांचे आरक्षण झाले आहे. त्यामुळे मतदानावर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरामध्ये नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यातून आणि देशाच्या विविध भागातून आलेले नागरिक याच शहरांमध्ये स्थायिक झालेले आहेत. ते या शहरांमधील मतदारही आहेत. पुण्यात नेमक्या कोणत्या भागातील सर्वाधिक नागरिक वास्तव्यास आहेत, हे प्रामुख्याने दिवाळीच्या निमित्ताने शहरातून बाहेर जाणाऱ्या रेल्वे किंवा खासगी, एसटी बसच्या माध्यमातून लक्षात येते. दिवाळीत उत्तरेकडील राज्यात जाण्यासाठी रेल्वेला सर्वाधिक गर्दी असते. बहुतांश गाडय़ांना आरक्षण मिळत नाही. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये पुण्यातून सर्वाधिक नागरिक विदर्भात जातात. दरवर्षी ही स्थिती समोर येते.

यंदा दिवाळीपूर्वी २१ ऑक्टोबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे. रेल्वे किंवा खासगी बसच्या आरक्षणाचा आढावा घेतला, तर या कालावधीत नेहमीप्रमाणे दिवाळीचे आरक्षण सुरू आहे. प्रवाशांची मागणी लक्षात घेता रेल्वेकडून जादा गाडय़ांचे नियोजन करण्यात आले आहे. नागपूर, जयपूर, गोरखपूर, मंडुआडीह (वाराणसी) आदी भागात जादा गाडय़ा सोडण्यात आल्या आहेत. या गाडय़ांमधील उच्च श्रेणीच्या जागा शिल्लक असल्या, तरी सामान्य श्रेणी आणि शयनयानचे आरक्षण जवळपास संपले आले आहे. अतिरिक्त गाडय़ांसह पुण्यातून पटना, बिलासपूर, हटिया, हावडा, निजामुद्दीन, गोरखपूर, लखनौ, दरभंगा, अहमदाबाद, वैरावळ, एर्नाकुलम आदी ठिकाणी जाणाऱ्या नियमित गाडय़ांनाही मागणी आहे.

खासगी प्रवासी बसनेही मोठय़ा प्रमाणावर दिवाळीत प्रवास केला जातो. नागपूर, अमरावतीसह विदर्भातील बहुतांश ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यंदाची चांगली मागणी आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना मतदानावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा स्थितीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आव्हान राजकीय पक्षांसह प्रशासनापुढे आहे.

शाळेची सुटी बदलली, पण..

शाळांना दिवाळीची सुटी यंदा २१ ऑक्टोबरपासून जाहीर करण्यात आली होती. मात्र, मतदान लक्षात घेता आता २४ ऑक्टोबरपासून शाळांना दिवाळीच्या सुटय़ा देण्यात आल्या आहेत. मुलांच्या सहामाही परीक्षा १८ ऑक्टोबपर्यंत पूर्ण होणार आहेत. रविवारी साप्ताहिक सुटी तर निवडणुकीच्या दिवशी २१ ऑक्टोबरला मतदानासाठी शाळा बंद राहणार आहेत. मुळात सुटीतील बदल हा निवडणुकीच्या कामांमध्ये सहभागी शिक्षकांसाठी आहे. ही स्थिती लक्षात घेता सुटीतील बदलामुळे २१ ऑक्टोबर किंवा त्यापूर्वी गावी जाण्यासाठी झालेल्या आरक्षणावर कोणताही परिणाम होण्याची शक्यता दिसत नाही.

दिवाळीच्या निमित्ताने यंदाही रेल्वेकडून प्रवाशांची मागणी पाहता जादा गाडय़ा सोडण्यात आल्या आहेत. त्यानुसार नेहमीप्रमाणे या गाडय़ांचे आरक्षण होत आहे. नागपूर, गोरखपूर,  मंडुआडीह (वाराणसी), जयपूर आदी चार दिशांसाठी गाडय़ा आहेत. १८ ते २१ ऑक्टोबपर्यंत या गाडय़ांचे सर्वसामान्य डबे आणि शयनयानचे आरक्षण पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. वातानुकूलित श्रेणीतील काही जागा शिल्लक आहेत.

– मनोज झंवर, पुणे रेल्वे जनसंपर्क अधिकारी