पुणे : ससून रुग्णालयात येणारे रुग्ण हे प्रामुख्याने गरीब असतात. अशा रुग्णांना बाहेरून औषधे आणण्यास सांगू नये. रुग्णालयात उपलब्ध असतील तीच औषधे डॉक्टरांनी लिहून द्यावीत, अशी तंबी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी शुक्रवारी दिली.

मुंबईतील जे. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थिव्यंगोपचार विभागाचे प्रमुख डॉ. एकनाथ पवार यांच्याकडे ससूनच्या अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्यांनी शुक्रवारी पदाची सूत्रे हाती घेतली. यानंतर महाविद्यालय परिषदेची बैठक त्यांनी घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, औषधखरेदी आणि रुग्णांना बाहेरून औषधे आणण्यास लावण्याच्या मुद्द्यावर बैठकीत चर्चा झाली. डॉक्टरांनी कोणत्याही परिस्थितीत रुग्णांना बाहेरून औषधे आणावयास सांगू नये. रुग्णांना औषधे लिहून देताना रुग्णालयात उपलब्ध असतील तीच औषधे द्यावीत, अशी तंबी त्यांनी दिली.

आणखी वाचा-पुण्यात डेंग्यूचा उद्रेक! मोठ्या संख्येने रुग्ण आढळल्याने महापालिका ‘ॲक्शन मोड’वर

मागील काही दिवसांत ससूनमधील डॉक्टरांनी रुग्णांना बाहेरून औषधे आणण्यास सांगितल्याच्या घटना घडल्या होत्या. रुग्णांना रुग्णालयातच मोफत औषधे देण्याचे धोरण आधीपासून स्वीकारण्यात आले आहे. मात्र, काही डॉक्टर रुग्णांना बाहेरून औषधे आणण्यास सांगतात, अशा तक्रारी वारंवार येतात. त्यामुळे डॉ. पवार यांनी पहिल्याच बैठकीत याची गंभीर दखल घेऊन असे प्रकार टाळण्याचे निर्देश दिले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ससूनला पूर्वीचा लौकिक मिळवून देणार

अधिष्ठाता पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लोकसत्ताशी बोलताना डॉ. पवार म्हणाले, की मी याच महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. त्यामुळे मला या संस्थेबद्दल आत्मीयता आहे. मागील काही काळात घडलेल्या घटनांमुळे संस्थेच्या लौकिकाला धक्का बसला आहे. संस्थेला पूर्वीचा लौकिक मिळवून देण्याचे माझे प्रयत्न असतील. ससून रुग्णालयातील रुग्णसेवा सुधारण्यास प्राधान्य दिले जाईल. रुग्णांना योग्य आणि वेळेत उपचार मिळावेत या दृष्टीने पावले उचलली जाणार आहेत.