पुणे : एक वृद्ध घरात पाय घसरून पडला. त्यात त्याच्या मांडीच्या हाडाचा वरचा भाग मोडून गंभीर दुखापत झाली. या वृद्धाला हृदयविकारासह उच्च रक्तदाब असल्याने तो रक्त पातळ करण्याची औषधे घेत होता. त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याची जोखीम होती. डॉक्टरांनी या आव्हानावर मात करून त्याच्यावर यशस्वीपणे शस्त्रक्रिया केली. यामुळे हा ८८ वर्षीय वृद्ध पुन्हा पूर्वीप्रमाणे चालू लागला आहे.
याबाबत इनामदार मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमधील अस्थिशल्यचिकित्सक डॉ. सना अहमद सय्यद म्हणाले, ‘हा ८८ वर्षीय वृद्ध २५ मार्चला घरात पाय घसरून पडला होता. त्यात त्याच्या उजव्या मांडीचे हाड मोडले. त्यामुळे झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. या वृद्धाला आधीपासून हृदयविकारासह उच्च रक्तदाब होता. त्यामुळे तो रक्त पातळ करणारी औषधे घेत होता. वृद्धाच्या आधीच्या विकारांमुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करणे जोखमीचे होते. याचबरोबर त्याचे वय लक्षात घेताही शस्त्रक्रिया आव्हानात्मक होती.’
‘सुरुवातीला या वृद्धाचा हृदयविकार आणि उच्च रक्तदाब यावर उपाय सुरू करण्यात आले. त्यानंतर त्याची रक्त पातळ करणारी औषधे नियंत्रणात आणण्यात आली. वृद्धाची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्याच्यावर हेमिऑर्थोप्लास्टी ही अंशत: खुबा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेवेळी रक्तस्राव कमीत कमी व्हावा, यासाठी काळजी घेण्यात आली. त्यामुळे त्यांना शस्त्रक्रियेनंतर अतिदक्षता विभागात ठेवण्याची गरज निर्माण झाली नाही. वृद्ध रुग्णांमध्ये शस्त्रक्रियेची आधी घेण्यात येणारी काळजी अधिक महत्त्वाची ठरते,’ असे डॉ. सय्यद यांनी नमूद केले.
काही महिन्यांनंतर पुन्हा चालण्यास सुरुवात
शस्त्रक्रियेनंतर काही महिन्यांनंतर हा वृद्ध रुग्ण पुन्हा चालू लागला आहे. याबाबत तो म्हणाला की, पाय घसरून पडल्यानंतर डॉक्टरांनी मांडीचे हाड मोडल्याचे सांगितले होते. त्यामुळे मी अंथरुणाला खिळून राहणार की काय, अशी भीती मनात होती. डॉक्टरांनी मला विश्वासात घेऊन सर्व प्रक्रिया समजावून सांगितली. शस्त्रक्रिया केल्यानंतर मी आता पुन्हा चालू लागलो असून, संध्याकाळच्या वेळी नियमितपणे फिरायला जात आहे.
विविध प्रकारच्या अपघातांमुळे वृद्धांना गंभीर दुखापत होण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे हे वृद्ध अंथरुणावर खिळून पडण्याचा धोका असतो. अशा प्रकरणांमध्ये वेळीच योग्य उपचार केल्यास वृद्ध पुन्हा पूर्वीप्रमाणे त्यांचे आयुष्य जगू शकतात.- डॉ. सना अहमद सय्यद, अस्थिशल्यचिकित्सक