पुणे : डॉक्टरांनी प्रगत रोबोटिक शस्त्रक्रियेच्या माध्यमातून ६२ वर्षीय महिलेच्या छातीतून एक्टोपिक ट्युमर काढण्यात यश मिळविले आहे. याचे निदान दुर्मीळ एक्टोपिक थायरॉईड गॉइटर म्हणून झाले आहे. जगभरात १ ते ३ लाख व्यक्तींमध्ये एका व्यक्तीला अशी गंभीर समस्या निर्माण होते.
शरीरात सर्वसाधारण ठिकाणाऐवजी इतर ठिकाणी आढळून येणाऱ्या गाठीला एक्टोपिक ट्युमर असे म्हणतात. ही महिला प्रथम छातीत जडपणाची तक्रार घेऊन सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल (डेक्कन जिमखाना) येथे आली. तिच्या तपासणीत छातीच्या मध्यभागी – हृदय, श्वासनलिका आणि प्रमुख रक्तवाहिन्या असलेल्या भागात – मोठी गाठ दिसून आली. सुरुवातीला ती थायमस ग्रंथीची गाठ वाटत होती. परंतु, बायोप्सी तपासणीत हा एक दुर्मीळ एक्टोपिक थायरॉईड गॉइटर असल्याचे निदान झाले. तिच्या मानेतील थायरॉईड ग्रंथी पूर्णपणे सामान्य होती. तरीही थायरॉईड ऊतींची गाठ छातीत असल्याचे दिसून आले.
महिलेच्या छातीतील गाठ ही हृदय, ऊर्ध्व महाशीर, महाधमनी, फुप्फुसामधील धमनी आणि धमन्या व हृदयावरण अशा महत्त्वाच्या रचनांजवळ धोकादायक स्थितीत होती. शस्त्रक्रिया करून ती काढणे आव्हानात्मक होते. त्यामुळे डॉक्टरांच्या पथकाने रोबोटिक प्रक्रियेची निवड केली.
सुरुवातीला गाठीला छातीच्या अस्तरापासून हळुवारपणे वेगळे करण्यात आले. यासाठी महाधमनी व फुप्फुसीय धमन्यांमधील अरुंद, खोल भागातून मार्ग काढण्यात आला. रोबोटिक प्रक्रियेमुळे अचूकपणे शस्त्रक्रिया करून ही गाठ काढण्यात यश आले. ही शस्त्रक्रिया सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट डॉ. विनोद गोरे, लॅप्रोस्कोपिक व रोबोटिक सर्जन डॉ. संजय कोलते आणि डॉ. फुलचंद पुजारी, कार्डिओथोरॅसिक सर्जन डॉ. स्वप्नील कर्णे, भूलतज्ज्ञ डॉ. विकास कर्णे आणि डॉ. बालाजी मोमले यांच्यासह वैद्यकीय पथकाने केली.
रुग्णाच्या छातीमध्ये लहान छेद देऊन गाठ काढण्यात आली आणि छातीचा पिंजरा पुन्हा योग्य स्थितीत आणण्यात आला. रोबोटिक प्रक्रियेमुळे या शस्त्रक्रियेत कमीत कमी रक्तस्राव झाला. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला रक्त संक्रमणाची वा व्हेंटिलेटरची गरज भासली नाही. त्यामुळे रुग्ण बरा होण्याची प्रक्रियाही सुलभ होती. – डॉ. फुलचंद पुजारी, लॅप्रोस्कोपिक सर्जन, सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल