पुणे : आठ महिन्यांच्या एका मुलाला अचानक ताप, पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्याला लघवीलाही कमी होऊ लागली. प्रकृती खालावल्याने पालकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. तपासणीत दोन्ही मूत्रपिंडांत खडे निर्माण झाल्याचे निदान झाले. या खड्यांमुळे दोन्ही मूत्रपिंडे निकामी होण्याचा धोका होता. डॉक्टरांनी वेळीच शस्त्रक्रिया करून हे खडे काढल्याने मूत्रपिंडांना होणारी इजा टाळता आली.

या बालकाला ताप, पोटदुखीचा त्रास होता. लघवीला लालसर रंग आणि लघवीचे प्रमाण कमी होणे अशी लक्षणे जाणवत होती. मूत्रमार्गातील संसर्गाची शक्यता गृहीत धरून पंधरवड्यापासून त्याच्यावर बाह्य रुग्ण विभागात उपचार सुरू होते. तरीही त्याची प्रकृती झपाट्याने खालावत होती. त्या वेळी त्याची तपासणी करण्यात आली. त्यात दोन्ही मूत्रपिंडांत खडे असून, त्यामुळे मूत्रपिंडांना दुखापत झाली होती. ते मूत्रप्रवाह अडवत असल्याचे निदान झाले. या बाळाला तत्काळ बाल अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.

सूर्या हॉस्पिटलमधील बाल मूत्रविकारतज्ज्ञ डॉ. अखिल माने आणि बाल मूत्रपिंडविकारतज्ज्ञ डॉ. मधुरा फडणीस-खरदकर यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय पथकाने बाळावर उपचार सुरू केले. बाळ रुग्णालयात दाखल होताना त्याच्या मूत्रपिंडांनी लघवी तयार करणे पूर्णपणे थांबवले होते. या स्थितीला ॲनुरिया म्हणतात.

सर्वप्रथम त्याची प्रकृती स्थिर करणे, मूत्रपिंडांचे कार्य टिकवून ठेवणे, द्रवसंतुलन राखणे आणि इलेक्ट्रोलाइट तपासणे याला प्राथमिकता देण्यात आली. उपचारादरम्यान त्याला कॅल्शिअमची तीव्र कमतरता जाणवली. ती पूरक औषधांनी भरून काढण्यात आली. त्यानंतर शस्त्रक्रिया करून मूत्रपिंडांतील खडे काढण्यात आले. प्रकृतीत सुधारणा झाल्याने या बाळाला शस्त्रक्रियेनंतर १० दिवसांनी घरी सोडण्यात आले.

लहान बालकांच्या मूत्रपिंडात खडे होण्याची घटना कमी आढळते. मात्र, शहरी भागातील बालकांमध्ये अशा प्रकारच्या समस्यांमध्ये वाढ होत आहे. सतत बसून राहण्याची सवय, पाणी कमी पिणे, अधिक मीठ असलेला आहार घेणे आणि प्रक्रियायुक्त अन्नाचे जास्त सेवन ही त्यामागील मुख्य कारणे आहेत. बहुतांश मुलांमध्ये पाच वर्षांनंतर अथवा पौगंडावस्थेत अशा समस्या दिसून येतात. लहान बाळांमध्ये खडे होऊन मूत्रपिंड निकामी होण्याची प्रकरणे एकूण बालरुग्णांमध्ये एक टक्क्यापेक्षाही कमी आहेत. – डॉ. अखिल माने, बाल मूत्रविकारतज्ज्ञ