पुणे : दस्त नोंदणीचे सर्व्हर गुरुवारी (१४ ऑगस्ट) मध्यरात्रीपासून रविवारी मध्यरात्रीपर्यंत बंद राहणार आहेत. सर्व्हरच्या नियमित देखभाल-दुरुस्तीचे काम या तीन दिवसांत होणार आहे. त्यामुळे या कालावधीत दस्त नोंदणी होऊ शकणार नसल्याची माहिती नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून देण्यात आली.

नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाच्या ‘आय सरिता’ या सर्व्हरच्या देखभाल दुरुस्तीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रणालीअंतर्गत दस्त नोंदणीसह अन्य सेवाही बंद राहणार आहेत.

शुक्रवारी स्वातंत्र्यदिन असल्याने सार्वजनिक सुटी आहे. त्यानंतर शनिवारी आणि रविवारी पुणे शहरातील २७ पैकी २२ दुय्यम निबंधक कार्यालये बंद असतात. तर, पाच दुय्यम निबंधक कार्यालयांमधून दस्त नोंदणी होत असते. या ठिकाणी एका दिवसाला सरासरी २०० दस्तांची नोंदणी होत असते. सलग तीन दिवस सुटी असली, तरी या पाच कार्यालयांमधील दस्त नोंदणीवर फारसा परिणाम होणार नाही, असे नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने सांगितले आहे. दरम्यान, सर्व्हरच्या देखभाल दुरुस्तीचे काम महत्त्वाचे असून, त्यानंतर सर्व्हरमुळे दस्त नोंदणीला वेग येणार असल्याचे जिल्हा सहनिबंधक संतोष हिंगाणे यांनी सांगितले.