‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी जोपर्यंत सापडत नाहीत तोपर्यंत दाभोलकर कुटुंबीयांनी ‘पद्मश्री’ सन्मान स्वीकारू नये,’ अशा शब्दांत ज्येष्ठ दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तर, ‘पालेकर यांची भावना समजू शकतो, परंतु पद्मश्री हा सन्मान डॉ. दाभोलकर यांच्यावर देशाने व नागरिकांनी केलेल्या प्रेमाचे प्रतीक आहे,’ असे म्हणत डॉ. हमीद दाभोलकर यांनी हा सन्मान स्वीकारणार असल्याचे स्पष्ट केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि मॅग्नम ओपस यांच्यातर्फे ‘प्रश्न तुमचा उत्तर दाभोलकरांचे’ या ध्वनिचित्रफितीचे पालेकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या वेळी पालेकर बोलत होते. डॉ. शैला दाभोलकर, डॉ. हमीद दाभोलकर, ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगांवकर, ‘मॅग्नम ओपस’चे संस्थापक गिरीश लाड, महाराष्ट्र अंनिसचे अध्यक्ष अविनाश पाटील, ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाठ या वेळी उपस्थित होते. या डीव्हीडीत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची मुलाखत असून त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासंबंधीच्या २६ प्रश्नांची उत्तरे सविस्तर दिली आहेत.
पालेकर म्हणाले, ‘‘न पटणारा विरोधी विचार संपवणे हा दहशतवाद आहे. डॉ. दाभोलकर यांची हत्या हा विचार संपवण्याचा प्रयत्न होता, मात्र विचार मारता येत नाही. दाभोलकर यांचे मारेकरी सापडत नाहीत तोपर्यंत दाभोलकर कुटुंबीयांनी पद्मश्री सन्मान स्वीकारू नये.’’
‘डॉ. दाभोलकर कधीच धर्माच्या विरोधात नव्हते. विवेकवादी चळवळीचा प्रसार व्हावा यासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याची आवश्यकता आहे,’ असे शैला दाभोलकर यांनी सांगितले.
पद्मश्री हे नागरिकांच्या प्रेमाचे प्रतीक
– डॉ. हमीद दाभोलकर
पालेकर यांच्या वक्तव्यावर आपली भावना व्यक्त करताना डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले, ‘‘पालेकर यांची भावना मी समजू शकतो. अनेक नागरिकांचीही हीच भावना आहे. पण पद्मश्री सन्मान हा देशाने व नागरिकांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर केलेल्या प्रेमाचे प्रतीक आहे, अशी आमची व महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. असे असले तरी हा पुरस्कार स्वीकारताना आम्हाला आनंद नाही, दु:खच होईल. दाभोलकरांचे मारेकरी व सूत्रधार अजूनही मोकाट असल्याबद्दल तीव्र वेदना व खंत वाटते. पोलिसांनी या प्रकरणी पकडलेल्या व्यक्तींची सखोल चौकशी करून आदेश देणारे कोण याचा लवकरात लवकर छडा लावावा.’’
‘एक उपवास वेदनेचा’
आज डॉ. दाभोलकर यांची हत्या होऊन गुरूवारी ६ महिने पूर्ण होत आहेत. यानिमित्त परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते या दिवशी ‘एक उपवास वेदनेचा’ या उपक्रमाअंतर्गत उपवास करून निषेध नोंदवणार आहेत, असे हमीद यांनी सांगितले. गुरूवारी सकाळी ९.३० ते ११.३० या वेळात वारकरी संप्रदायातील कार्यकर्ते ओंकारेश्वर मंदिराजवळ विवेकवादासंबंधी कीर्तन सादर करणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 20th Feb 2014 रोजी प्रकाशित
मारेकरी सापडेपर्यंत दाभोलकर कुटुंबीयांनी ‘पद्मश्री’ स्वीकारू नये- अमोल पालेकर
‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी जोपर्यंत सापडत नाहीत तोपर्यंत दाभोलकर कुटुंबीयांनी ‘पद्मश्री’ सन्मान स्वीकारू नये,’ अशा शब्दांत ज्येष्ठ दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
First published on: 20-02-2014 at 03:18 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dont accept padmashree amol palekar