राज्यभरातील हमाल, माथाडींचे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत

डॉ. बाबा आढाव यांची शरद पवार यांच्याबरोबर चर्चा

डॉ. बाबा आढाव यांची शरद पवार यांच्याबरोबर चर्चा

पुणे : राज्यातील कामगार विभाग, हमाल, माथाडी कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत तसेच केंद्रातील काही प्रलंबित मागण्यांबाबतही पाठपुरावा करण्यात यावा, अशी मागणी ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे केली. डॉ. आढाव यांनी पवार यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांबाबतचे निवेदन दिले. श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे यावेळी उपस्थित होते. राज्यातील कामगार विभागात केवळ ४५ टक्के अधिकारी आणि कर्मचारी आहेत. उर्वरित रिक्त पदे भरावीत. माथाडी सल्लागार विभाग मंडळ नियुक्त करून त्यात महसूल विभागातील कामगार प्रतिनिधींना स्थान द्यावे. स्थानिक मंडळाची रचना तातडीने करावी, असे डॉ. आढाव यांनी निवेदनात म्हटले आहे.बाजार समिती, शासकीय धान्य गोदाम, वखार महामंडळ, रेल्वे मालधक्का येथे काम करणाऱ्या हमाल मापाडय़ांची कामे अत्यावश्यक सेवेत येत असल्याने आपत्कालीन परिस्थितीत काम करणाऱ्यांना विमा संरक्षण देण्यात यावे.  स्थलांतरित कामगारांची नोंद सामाजिक सुरक्षा कायद्याखाली झाली पाहिजे. दिल्ली राज्य सरकारने माथाडी कामगार कायद्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही डॉ. आढाव यांनी निवेदनात नमूद केले आहे.  समितीची व्यवस्था टिकली पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. पणन विभागातील तोलणारांचा प्रश्न महत्त्वाचा आहे. सुनील पवार समितीचा अहवाल तोलाईदार घटकांची आवश्यकता व्यक्त करणारा आहे. काही जणांनी या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. तोलणारांची बाजू मांडण्यासाठी राज्य शासनाने महाधिवक्त्यांमार्फत बाजू मांडावी. राज्यातील हजारो तोलणारांचा रोजगार वाचवावा, अशी अग्रही मागणीही डॉ. आढाव यांनी निवेदनात केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Dr baba adhav meet sharad pawar discussed maharashtra mathadi workers issue zws