डॉ. दाभोलकर खून प्रकरणातील अटकेत असलेले आरोपी मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल यांची ‘नार्को चाचणी’ करण्याचा विचार पुणे पोलीस करीत आहेत. त्याबाबत न्यायालयाकडे लवकरच अर्ज करण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच, डॉ. दाभोलकर खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीकडून दोघांची ओळख परडे घेतली जाणार आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
नागोरी व खंडेलवाल यांनी मंगळवारी न्यायालयात असा आरोप केला होता की, हा गुन्हा कबूल करण्यासाठी एटीएस प्रमुख राकेश मारिया यांनी आपणाला २५ लाखांचे आमिष दाखविले होते. त्याच बरोबर या संदर्भात आपली नार्को चाचणी करावी, अशी मागणी नागोरीने न्यायालयात केली होती. या पाश्र्वभूमीवर पुणे पोलिसांनी नागोरी व खंडेलवाल यांची नार्को चाचणी करण्याचे ठरविले असल्याचे समजते.             पोलिसांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला
दरम्यान, नागोरी व खंडेलवाल यांच्याकडून मुब्रा पोलिसांनी जप्त केलेली तीन पिस्तूल तपासासाठी मिळावीत, असा अर्ज पुणे पोलिसांचा न्यायालयाकडे केला होता. तो न्यायालयाने फेटाळून लावला. पोलिसांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करून ही पिस्तूल मागून घ्यावीत, असे न्यायालयाने म्हटले आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणात शस्त्रास्त्र पुरविल्याच्या आरोपावरून नागोरी आणि खंडेलवाल यांना सोमवारी रात्री पुणे पोलिसांनी अटक केली आहे. दोघांना न्यायालयाने २८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. मुंब्रा पोलिसांनी २० ऑगस्ट रोजी एका खंडणीच्या गुन्ह्य़ात दोघांना अटक केली होती. त्यावेळी त्यांच्याकडून तीन पिस्तूल जप्त करण्यात आली होती. खंडेलवाल याच्याकडे सापडलेले पिस्तूल आणि डॉ. दाभोलकर यांना लागलेल्या गोळ्या यांच्यात साम्य असल्याचा बॅलेस्टिकचा अहवाल आला आहे. त्यानुसार न्यायालयाच्या परवानगीने दोघांना अटक केली होती. याबाबत सरकारी वकील माधव पौळ यांनी सांगितले की, मुंब्रा पोलिसांनी जप्त केलेली पिस्तूल पुणे पोलिसांना देण्याचे निर्देष ठाणे पोलिसांना द्यावेत, म्हणून पुणे पोलिसांनी बुधवारी फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कायदा ९१ नुसार न्यायालयात अर्ज केला होता. तो न्यायालयाने फेटाळून लावला. पोलिसांना ही पिस्तूल मागण्याचे अधिकार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.