माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची ८४ वी जयंती ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्याचे आदेश शासनाने दिले असले, तरी अनेक शाळांमध्ये हा दिवस परीक्षेच्या तयारीतच गेल्याचे दिसत होते. काही शिक्षणसंस्था आणि संघटनांनी मात्र यानिमित्ताने गुरुवारी विविध उपक्रमांचे आयोजन केले होते.
या वर्षीपासून डॉ. कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याबाबतचे आदेशही शिक्षणसंस्थांना देण्यात आले होते. मात्र, तोंडावर आलेल्या सत्र परीक्षांच्या पाश्र्वभूमीवर शाळांमध्ये याबाबत उत्साह कमीच दिसत होता. बहुतेक महाविद्यालयांनीही या उपक्रमाकडे दुर्लक्षच केल्याचे दिसत होते.
काही शिक्षणसंस्था आणि संघटनांनी मात्र हा दिवस उत्साहाने साजरा केला. कै. कॅप्टन शिवरामपंत दामले प्रशालेत मराठी, हिंदी, इंग्रजी व संस्कृत या विविध भाषांमध्ये वाचनाविषयक कार्यक्रम सादर केले. तसेच विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. एम.सी.ई. सोसायटीच्या (आझम कँपस) इंग्रजी माध्यमाच्या शाळेत कलाम यांच्या ‘अग्निपंख’ व ‘भारत २०२०’ ही पुस्तके विद्यार्थ्यांकडून वाचून घेण्यात आली. त्याचप्रमाणे दप्तराविना शाळा भरवण्यात आली होती. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत मंगला आहेर यांचे ‘वाचन कौशल्य कसे वाढवावे’ या विषयावर व्याख्यान झाले, तर शिक्षकांनी नाटय़वाचन, कथावाचन सादर केले. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या मागासवर्गीय विभागातर्फे पुणे महानगरपालिकेच्या पद्मावती येथील वि. स. खांडेकर शाळेतील विद्यार्थ्यांना भारतातील थोर राष्ट्रीय नेत्यांच्या चरित्रांचा संच देण्यात आला.
ग्रंथ प्रदर्शनांचेही आयोजन
विविध ग्रंथालये आणि संघटनांकडून ग्रंथप्रदर्शनांचेही आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयातर्फे ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शन पुढील दोन दिवस सुरू राहणार असून त्यात विविध विषयांवरील पुस्तके, संदर्भग्रंथ, मासिके, साप्ताहिके आदी पुस्तके आहेत. शहीद अशफाक उल्लाह खान मेमोरियल ट्रस्टतर्फे अध्यक्ष लतीफ मगदूम यांनी कलाम यांचे भारताला महासत्ता बनवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.