प्रसिद्ध होमिओपॅथी डॉक्टर आणि प्रोगेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे उपकार्याध्यक्ष माधव नामजोशी (वय ६८) यांचे सोमवारी (३० मे) येथे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी कल्याणी आणि पुतण्या असा परिवार आहे. वैद्यकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात डॉ. नामजोशी यांचे मोठे योगदान होते.
डॉ. नामजोशी हे शहरातील एक ख्यातनाम होमिओपॅथी डॉक्टर म्हणून परिचित होते. गरजू रुग्णांची ते विनामूल्य तपासणी करत असत. अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी रुग्णांची सेवा केली. वनस्पतिशास्त्र या विषयाची त्यांना विशेष आवड होती. त्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांसाठी काही अभ्यासक्रमही सुरू केले होते. प्रोगेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे गेल्या तीस वर्षांपासून डॉ. नामजोशी सदस्य होते. तसेच, गेली बावीस वर्ष ते उपकार्याध्यक्ष म्हणून काम पाहात होते. संस्था संचालित इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.
मॉडर्न सेंटर फॉर इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी अँड रिसर्च ही संस्था उभारण्यातही त्यांचे मोलाचे योगदान होते. शेती, संगीत व क्रीडा याविषयांत त्यांना विशेष रुची होती. त्यांची पत्नी कल्याणी या संस्थेच्या उपाध्यक्ष आहेत.
डॉ. नामजोशी यांना सोमवारी हृदयविकाराचा तीव्र झटका आला व त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, डॉ. नामजोशी यांचा मित्रपरिवार तसेच संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr madhav namjoshi passes away
First published on: 01-06-2016 at 00:55 IST