डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या सुपारी देऊन झाली असल्याची शक्यता असल्याने याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तळोजा आणि येरवडा कारागृहातील सराईत गुन्हेगारांकडे चौकशी केली आहे. त्यांच्याकडून कोणी सुपारी घेऊन हत्या केली याची माहिती घेण्यात येत आहे. दरम्यान, डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासाची माहिती घेण्यासाठी राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी शुक्रवारी दुपारी पुणे पोलिसांची बैठक घेतली. गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांना तपासाबाबात सूचना करून पथकांची संख्या वाढविण्यास सांगितले, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त राजेश बनसोडे यांनी दिली.
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला चार दिवस उलटल्यानंतरही पोलिसांना अद्याप ठोस असे धागेदोरे मिळालेले नाहीत. मात्र, काही शक्यतांवर पोलिसांचे काम सुरू आहे. या पाश्र्वभूमीवर राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी पुणे पोलिसांची शनिवारी दुपारी पाषाण येथे बैठक घेतली. या वेळी शहरातील तपासी अधिकारी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यात त्यांनी लवकरात लवकर तपास लागण्याच्या सूचना दिल्या.
या बैठकीबाबत गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे यांनी सांगितले की, या हत्याप्रकरणात पुणे पोलिसांनी आतापर्यंत काय तपास केला याचा सविस्तर आढावा या बैठकीत पोलीस महासंचालकांनी घेतला. त्यांनी तपासाबाबत काही सूचना केल्या व तपासासाठी पथकांची संख्या वाढविण्यास सांगितले. या गुन्ह्य़ाच्या तपासासाठी आता एकूण १८ पथके काम करत आहेत. त्यामध्ये दोनशेपेक्षा जास्त पोलीस अधिकारी आणि कर्मचारी काम करत आहेत. स्थानिक पोलीस ठाण्याचा समांतर तपासही सुरू आहे. आतापर्यंत साधारण बाराशे लोकांकडे चौकशी करण्यात आली आहे. बाहेर गेलेल्या पथकांकडून वेगवेगळी माहिती येत आहे. त्यानुसार काम सुरू आहे. येरवडा आणि तळोजा कारागृहातील गुन्हेगारांकडेही चौकशी करण्यात आली आहे. मात्र, अद्यापपर्यंत ठोस असे धागेदोरे मिळालेले नाहीत.
पुण्यातील चार सामाजिक कार्यकर्त्यांना सुरक्षा
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची गोळय़ा झाडून हत्या केल्यानंतर पुण्यातील चार सामाजिक कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांकडून सुरक्षा पुरविण्यात आली. दाभोलकर यांना हत्येपूर्वी अनेक वेळा धमक्या आल्या होत्या. पण, त्यांना सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात का आली नाही, असा प्रश्न विचारला जात आहे. दाभोलकर यांच्या हत्येच्या पाश्र्वभूमीवर पुणे पोलिसांच्या विशेष शाखेकडून शहरातील चार सामाजिक कार्यकर्त्यांना सुरक्षा पुरविण्यात आली. ‘या कार्यकर्त्यांच्या जीविताला धोका असल्याची माहिती विशेष शाखेला मिळाल्यामुळे त्यांना पोलिसांकडून स्वत:हून सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली आहे,’ अशी माहिती विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त एम. बी. तांबडे यांनी दिली.