पुणे : ‘बालसाहित्य संमेलने, साहित्य संमेलनात बालसाहित्याचा विचार आणि बालसाहित्याला पुरस्कार दिले पाहिजेत. त्यामुळे बालसाहित्य निर्मितीला प्रोत्साहन मिळेल,’ असे मत राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी शुक्रवारी व्यक्त केले.‘दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटी’च्या वर्धापनदिनानिमित्त डॉ. प्रभा अत्रे फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘इंदिरा अत्रे बालसाहित्य’ पुरस्कार वितरण कार्यक्रमात डॉ. मोरे बोलत होते. सचिव डॉ. भारती एम. डी., दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीचे मानद सभासद अभिजित जोग या वेळी उपस्थित होते.

डॉ. शंतनू अभ्यंकर यांना ‘शास्त्रज्ञ आजीच्या गोष्टी’, राजीव तांबे यांना ‘डेंजरस झिरो ग्राउंड प्लेट’, वर्षा चौगुले यांना ‘गंमत शब्दांची’, संजीवनी बोकील यांना ‘गोष्टींतून कबीर’ या पुस्तकासाठी पुरस्काराने गौरविण्यात आले. मिलिंद सबनीसलिखित ‘कहानी वंदे मातरम्’ची या पुस्तकाच्या मुखपृष्ठ-चित्रांसाठी चंद्रशेखर जोशी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

‘बालसाहित्यातून मुलांची केवळ करमणूक होत नाही. त्यातून त्यांच्यावर संस्कार होत असतात. समाजात वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अंगिकार व्हावा म्हणून वैज्ञानिक मांडणी असलेल्या बालसाहित्याचे महत्त्व मोठे आहे,’ असेही त्यांनी सांगितले.डॉ. मोरे म्हणाले, ‘मुले गोष्टीवेल्हाळ असतात. बालसाहित्याच्या माध्यमातून मुलांची फक्त करमणूकच नव्हे तर त्यांना सिद्धांत सांगणे, त्यांच्यावर संस्कार करणे, संदेश देणे आणि त्यांच्यातील जिज्ञासा जागृत करण्याचे कार्य केले जाते. लहान मुले समाजाचा महत्त्वाचा घटक असतात. ते उद्याचे सुजाण नागरिक असतात. त्यामुळे विज्ञान आणि संस्कृती त्यांच्यापर्यंत पोहचवण्यासाठी साहित्य निर्मितीचा व्यवहार घडायला हवा.’

‘इंदिरा अत्रे या बालसाहित्यकार म्हणून प्रसिद्ध असल्या, तरी त्यांची लेखनकक्षा रूंद होती. अवघड विषय सोपा करून सांगण्यात त्यांची हतोटी होती. डॉ. प्रभा अत्रे यांनी इंदिरा अत्रे यांच्या नावे बालसाहित्यकार पुरस्कार सुरू करून त्यांचे स्मारक उभारले आहे. या पुरस्कारप्राप्त पुस्तकांच्या माध्यमातून विज्ञान आणि संस्कृती मुलांपर्यंत सहजतेने पोहोचणार आहे,’ असेही मोरे म्हणाले. संयोजन समिती प्रमुख प्रसाद भडसावळे यांनी प्रास्ताविक केले.