पुणे : पुणे महापालिकेच्या प्रारूप प्रभागरचनेने सत्ताधारी महायुतीबरोबरच महाविकास आघाडीतील इच्छुकांची कोंडी झाली आहे. प्रारूप तयार करताना भाजपच्या काही स्थानिक वरिष्ठ नेत्यांनी महाविकास आघाडी आणि महायुतीतील इच्छुकांबरोबरच भाजपच्याही काही इच्छुकांना प्रभागरचनेतूनच ‘घरची वाट’ दाखविण्याची व्यूहरचना आखल्याची चर्चा आहे. या प्रकाराने महाविकास आघाडी आणि महायुतीतील इच्छुक हतबल झाले असताना भाजपच्या इच्छुकांना तर कोणाकडे गाऱ्हाणे मांडायचे, असा प्रश्न पडला आहे.
प्रभागाबाबत काही बोलावे, तर भविष्यात पक्षाकडून उमेदवारीला धोका आणि नाही बोलावे तर मतदारांकडून धोका, अशा कचाट्यात इच्छुक सापडल्याने सध्या भाजपमधील इच्छुक मौनावस्थेत आहेत. या अन्यायाला उघडपणे वाचा फोडता येत नसल्याने भाजपमधील काही इच्छुकांनी विश्वासातल्या माणसांना पुढे करून हरकती घेतल्या आहेत. त्यामुळे पुण्यात हरकतींचा पाऊस पडला आहे. या हरकतींवर सुनावणी होऊन बदल होतील, याकडे इच्छुक डोळे लावून बसले आहेत.
पुणे महापालिकेची प्रारूप प्रभागरचना करताना बहुतांश प्रभागांचे तुकडे पाडण्यात आले आहेत. त्यासाठी भाजपच्या काही स्थानिक वरिष्ठ नेत्यांनी बारकाईने अभ्यास केल्याची चर्चा आहे. ही रचना तयार करताना महाविकास आघाडीला यश मिळवून देणारे प्रभाग तोडून भाजपबहुल प्रदेशाला जोडण्याची खेळी संबंधित नेत्यांनी केल्याचाही आरोप होत आहे. हे करताना महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि शिवसेना (ठाकरे) या पक्षांबरोबरच महायुतीतील शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या पक्षांतील इच्छुकांचेही मनसुबे धुळीस मिळतील, याची खबरदारी घेण्यात आली आहे. त्यामुळे प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे इच्छुक नाराज झाले असून, त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे.
अजित पवार यांनी संबंधित भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांना खडे बोल सुनावले आहेत. त्यामुळे ‘प्रचंड आशावादी’ असलेल्या या पक्षातील इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सुनावणीनंतर काही प्रभागांमध्ये बदल होतील, असा त्यांचा कयास आहे. मित्रपक्ष शिवसेना (शिंदे) हा सध्या मौन बाळगून आहे. त्यामुळे त्यांच्याकडून उघडपणे अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त झालेली नाही.
महाविकास आघाडीतील विरोधी पक्ष आणि महायुतीतील मित्रपक्ष यांची कोंडी करतानाच भाजपच्या काही स्थानिक वरिष्ठ नेत्यांनी भाजपच्याच काही इच्छुकांना प्रभागरचनेतूनच ‘घरची वाट’ दाखविण्याची व्यूहरचना आखल्याचे दिसून येते. प्रभागरचना करताना संभाव्य उमेदवार कोण असेल, याचा अंदाज बांधून त्याप्रमाणे प्रारूप तयार करण्यात आल्याची चर्चा सध्या भाजपच्या गोटात आहे. याउलट काहींना तर उमेदवारीबाबत शब्द देण्यात आल्याचीही चर्चा होऊ लागली आहे. त्यामुळे इच्छुकांच्या फलकांवर आता प्रदेश पातळीवरील नेत्यांच्या छायाचित्रांबरोबरच स्थानिक नेत्यांची छबी दिसू लागली आहे. इच्छुकांच्या फलकबाजीतून कोणाला शब्द दिला असावा आणि त्या दृष्टीने प्रभागाची रचना करण्यात आली असावी, याचे तर्कवितर्क भाजपअंतर्गत लढविले जाऊ लागले आहेत.
प्रारूप प्रभागरचना तयार करताना भाजपच्या संबंधित स्थानिक नेत्यांनी भाजपच्याच कार्यकाळ संपलेल्या काही विद्यमान नगरसेवकांचे उमेदवारीचे दोर कापून टाकण्याचे प्रकार केल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, याबाबत मन मोकळे कोणाकडे करायचे, या विवंचनेत विद्यमान नगरसेवक पडले आहेत. हरकत घेतल्यास पक्षविरोधी भूमिका घेतल्याबाबत विचारणा होईल, याचीही भीती विद्यमान नगरसेवकांमध्ये आहे. त्यामुळे संबंधित विद्यमानांनी आपल्या विश्वासाच्या माणसांना हरकत घेण्यास लावली आहे. त्यामुळे प्रारूप प्रभागरचनेवर हरकतींचा पाऊस पडला आहे. आता या हरकतींवर सुनावणी होऊन बदल होईल, अशी आशा इच्छुक बाळगून आहेत.
कोणताही सत्ताधारी पक्ष हा सत्ता असताना प्रभागरचना करताना आपल्या पक्षाच्या दृष्टीने सोयीची रचना करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानुसार भाजपच्या संबंधित नेत्यांनी हे काम चोख बजावले आहे. शहरातील भाजपत इच्छुकांची संख्या जास्त असल्याने उमेदवारी कोणाला द्यायची, हा प्रश्न आगामी महापालिका निवडणुकीत अनेक प्रभागांत उभा राहणार आहे.
मागील सात वर्षांत अन्य पक्षांतून भाजपमध्ये आलेल्यांची संख्या वाढली आहे. त्या प्रत्येकाला आपल्यालाच उमेदवारी मिळणार, अशी शाश्वती वाटत आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत पक्षात किंवा बाहेरून आलेले यांच्यातून बंडखोरी होऊ नये, यासाठी कोणत्या तरी एका इच्छुकाचा पत्ता प्रभागरचनेतच कापण्याची व्यूहरचना भाजपने आखल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे प्रारूप प्रभागरचनेत भाजपमधील अनेक इच्छुकांचे हक्काची मते असलेले भाग तोडून त्याला अन्य परिसर जोडण्याची क्लृप्ती भाजपच्या स्थानिक वरिष्ठ नेत्यांनी खुबीने केली आहे. त्यांची ही खेळी इच्छुकांच्या लक्षात आली आहे. मात्र, याबाबत कोणाकडे उघडपणे बोलण्याची सोय राहिलेली नाही.
अशा परिस्थितीत अंतिम प्रभागरचना जाहीर होईपर्यंत सगळेच मौन बाळगून आहेत. अंतिम रचना प्रसिद्ध झाली, की काही जण मौन सोडायला लागतील आणि महापालिका निवडणुकीत भाजपमधील बंडखोर उभे राहतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सबब सध्या भाजपमधील इच्छुक ‘मौनव्रत’ धारण करून आहेत.
suijt.tambade@expressindia.com