उन्हाळय़ाच्या सुटीतील बाळगोपाळांचे मनोरंजन आणि विविध छंदवर्गाच्या उपस्थितीचे वेळापत्रक निश्चित झाले आहे. पारंपरिक पद्धतीने होणारे बालनाटय़ांचे प्रयोग रोडावत असल्याचे चित्र एकीकडे दिसत असताना ग्रिप्स चळवळीतील नाटकांनी मात्र बाळगोपाळांना वेगळय़ा पद्धतीने विचार करायला लावला. आता देखील सुटय़ा ध्यानात घेऊन ग्रिप्सची नाटय़चळवळ गेली २५ वर्षे अव्याहतपणे सुरू ठेवणाऱ्या महाराष्ट्र कल्चरल सेंटरतर्फे मुलांसाठी नाटय़महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत ‘गोष्ट सिम्पल पिल्लाची’ हे ग्रिप्स चळवळीतील नवीन नाटक रंगभूमीवर येत आहे.
मुलांच्या भावविश्वाशी निगडित असलेली ही नाटके खूप लोकपिय आहेत. बेगडी बाहय़ सौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्य जास्त महत्त्वाचे असते. मनाच्या आरशात तुम्ही सुंदर दिसत असाल तर बाहय़ जगातही तुम्ही सुंदर ठरता. या संकल्पनेवर आधारित ‘गोष्ट सिम्पल पिल्लाची’ या नव्या नाटकाचे प्रयोग शनिवारी (१७ मे) आणि रविवारी (१८ मे) टिळक रस्त्यावरील हिराबाग येथील ज्योत्स्ना भोळे सभागृह येथे सायंकाळी सात वाजता होणार आहेत. ग्रिप्स चळवळीशी गेली २० वर्षे अभिनेत्री या नात्याने निगडित असलेल्या राधिका इंगळे यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले असून, लेखन विभावरी देशपांडे यांचे आहे. श्रीरंग गोडबोले यांनी गाणी लिहिली असून नरेंद्र भिडे यांचे संगीत आहे, तर हृषीकेश पवार यांनी नृत्यदिग्दर्शन केले आहे.
प्रसिद्ध कवयित्री डॉ. संगीता बर्वे यांच्या निसर्ग आणि मानव यांच्या संबंधांवर आधारित काव्य आणि नृत्याविष्काराचा सहभाग असलेला ‘रानफुले’ हा कार्यक्रम शुक्रवारी (१६ मे) होणार आहे, तर ‘हाश्श हुश्श ठाळ ठुश्श’ या ग्रिप्सच्या नाटकाचा प्रयोग २० मे रोजी होणार असल्याचे महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या शुभांगी दामले यांनी सांगितले.