पोलिसांना सुरक्षेची चिंता; वापरावर र्निबध आणण्यासाठी नियमावली

निर्मितीपासूनच सुरक्षाविषयक प्रश्न उपस्थित करणारे ‘ड्रोन’ कॅमेरे पुणे पोलिसांसाठीही डोकेदुखी ठरू लागले आहेत. शहरात अशा कॅमेऱ्यांचा वापर वाढत चालला असून अगदी लग्नसोहळे किंवा राजकीय कार्यक्रमांचे चित्रिकरण करण्यासाठीही ‘ड्रोन’ कॅमेऱ्यांचा वापर होत असल्याचे दिसून आले आहे. मात्र, आकाशात भिरभिरणाऱ्या या कॅमेऱ्यांद्वारे पुण्यातील महत्त्वाच्या ठिकाणांची टेहळणी केली जाण्याची भीती असल्याने पुणे पोलिसांची चिंता वाढली आहे. त्यामुळेच पोलिसांनी आता अशा कॅमेऱ्यांच्या वापरावर र्निबध आणणारी नियमावली आखून दिली.

पुणे शहरात विविध समारंभ, राजकीय पक्षांच्या सभा, मोर्चे आदींपासून अगदी विवाह समारंभातही ड्रोन कॅमेऱ्यांचा सर्रास वापर होऊ लागला आहे. मोठय़ा कार्यक्रमांच्या छायाचित्रीकरणासाठी हे तंत्रज्ञान वापरले जाते. गेल्या काही महिन्यांपासून ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर मोठय़ा प्रमाणावर सुरू झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी ड्रोन कॅमेऱ्यांच्या वापरासाठी नियमावली आखून दिली आहे. पुणे पोलिसांच्या विशेष शाखेकडून (स्पेशल बँ्रच) परवानगी मिळाल्यानंतरच ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करता येतो. मात्र तशी परवानगी न घेताही या तंत्राचा वापर शहरात केला जातो. ही परवानगी मिळविणे अत्यावश्यक आहे. मात्र, ड्रोन वापरासाठी पोलीस तातडीने परवानगी देत नाहीत. कार्यक्रमाची शहानिशा करून खात्री पटल्यानंतर पोलिसांकडून परवानगी दिली जाते, असे विशेष शाखेतील पोलीस अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

कार्यक्रमासाठी ड्रोनचा वापर करणाऱ्या संयोजकांकडून पत्र स्वीकारण्यात येते. त्या पत्रात कार्यक्रमाचे स्वरूप नेमके काय आहे, ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करण्याची गरज आहे का याची माहिती घेतली जाते. कार्यक्रमात वापरण्यात येणाऱ्या ड्रोन कॅमेऱ्यांची संख्या तसेच नेमक्या किती उंचावरून ड्रोन कॅमेरे उडणार आहेत, कोणत्या ठिकाणी चित्रीकरण करण्यात येणार आहे, याची देखील माहिती कॅमेरा वापरणाऱ्यांकडून घेण्यात येते. चित्रीकरण झाल्यानंतर त्याची सीडी किंवा डीव्हीडी पोलिसांकडून पडताळण्यात येते. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करण्यात येणार आहे त्या पोलीस ठाण्यांना चित्रीकरणाची शहानिशा करावी अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. अनेक गोष्टींची खातरजमा झाल्यांतरच ड्रोन वापरास परवानगी दिली जाते, असेही विशेष शाखेतील अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

सर्वाधिक वापर ‘गुंठा मंत्र्यां’कडून

पुणे शहरात ड्रोन वापराचे प्रमाण वाढले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरालगत असलेल्या उपनगरांमध्ये प्रशस्त लॉन्स आहेत. तेथे राजकीय नेते, पक्षातील वरिष्ठ कार्यकर्ते आणि गुंठामंत्र्याच्या कुटुंबातील विवाह समारंभ पार पडतात. अशांच्या विवाह समारंभात चित्रीकरणासाठी मोठय़ा प्रमाणावर ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर केला जातो. गुंठामंत्री आणि राजकीय नेत्यांच्या कुटुंबातील सदस्याचा विवाह म्हणजे एक इव्हेंट असतो. वारेमाप पैसा उधळून शाही विवाह समारंभ पार पडतात. ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर शहरापेक्षा उपनगर तसेच पुणे जिल्ह्य़ात होतो, असे निरीक्षण एका व्यावसायिक छायाचित्रकाराने नोंदविले.

संयोजकांकडून सूचना

ड्रोन कॅमेरे वापरण्याची सूचना आम्हाला संयोजकांकडून करण्यात येते. पुणे शहरातील बहुतांश छायाचित्रकारांकडे स्वत:चे ड्रोन कॅमेरे नाहीत. त्यामुळे विवाहसमारंभात छायाचित्रीकरण करणारे छायाचित्रकार भाडय़ाने ड्रोन कॅमेरे आणतात. ज्याच्याकडून कॅमेरा आणण्यात येतो त्याने पोलिसांची परवानगी मिळविणे गरजेचे आहे. छायाचित्रकार पंचवीस ते तीस मिनिटांच्या चित्रीकरणासाठी कॅमेऱ्याच्या भाडय़ापोटी दहा ते वीस हजार रुपये मोजतात.

– पुरुषोत्तम कढे, व्यावसायिक छायाचित्रकार