पुणे: उन्हाळ्यातील वाढत्या तापमानामुळे उष्णतेच्या लाटा, उष्माघाताचा धोका सातत्याने वाढत आहे. मात्र, भारतात बाह्य लक्षणांनी ओळखता येणाऱ्या उष्माघातावरच लक्ष केंद्रित जात असून, एकूणच अतिउष्णतेचा आरोग्यावर होणाऱ्या परिणामांच्या नेमक्या नोंदींचा अभाव असल्याकडे प्रयास संस्थेने केलेल्या अभ्यासातून लक्ष वेधण्यात आले आहे. वाढते तापमान, उष्णतेच्या लाटा, उष्माघात या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्यूंची नेमकी नोंद, सर्व कारणांनी होणाऱ्या मृत्यूंची आकडेवारी (ऑल कॉज डेथ डेटा) जाहीर करण्याची गरज एका अभ्यासातून व्यक्त करण्यात आली आहे.

‘प्रयास’ संस्थेतील अभ्यासक आदित्य चुनेकर, रितू परचुरे यांनी ‘उष्णतेच्या पलीकडे : अति उष्णता किती धोकादायक?’ हा अभ्यास करून आढावा घेतला आहे. त्यात अति उष्णतेमुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांची नेमकी नोंद केली जाते का, उष्माघात आणि उष्माघातामुळे होणारे मृत्यू, उष्णतेच्या लाटांमुळे बसणारा फटका, शासकीय स्तरावरून केल्या जाणाऱ्या उपाययोजना, दीर्घकालीन धोरणांची गरज याचा वेध घेण्यात आला आहे.

या संदर्भात आदित्य चुनेकर म्हणाले, ‘आपल्याकडे प्रामुख्याने बाह्य लक्षणांनी दिसणाऱ्या उष्माघातावर लक्ष दिले जाते. तापमान वाढलेले असताना जास्त वेळ उन्हात राहिल्याने उष्माघात होतो. मात्र, तापमान वाढलेले असताना घरात किंवा अंतर्गत भागात असतानाही उष्माघात होऊ शकतो. ही बाब फारशी लक्षात घेतली जात नाही. आधीच काही व्याधी असलेल्यांना तापमान वाढल्याचा जास्त त्रास होऊ शकतो. केंद्र सरकारने उष्णतेच्या लाटेवेळी घ्यायच्या काळजीबाबत मार्गदर्शक सूचना तयार केलेल्या आहेत. मात्र, त्याबाबत पुरेशी जागृती नाही. पुण्यासारख्या शहरात गेल्या काही वर्षांत तापमान लक्षणीय वाढत असताना अधिक काळजी घेणे आवश्यक झाले आहे. उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्यूंची नेमकी नोंद होत नाही. अनेकदा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचे निदानही होत नाही. त्यामुळे व्यवस्थेमध्ये उष्माघात, त्याचे निदान, मृत्यूची नोंद करणे यावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे.’

‘अतिउष्णतेमुळे उष्माघाताचा धोका असतोच, पण त्या पलीकडे शरीरातील इतर अवयवांवरही विपरीत परिणाम होतो. त्यातून हृदयविकार, मूत्रपिंड निकामी होणे असे गंभीर आजार किंवा मृत्यूचा धोका वाढतो. त्या दृष्टीने सर्व कारणांनी झालेल्या मृत्यूंची (ऑल कॉज डेथ) आकडेवारी महत्त्वाची ठरते. करोना काळामध्ये ही आकडेवारी तयार केली जात होती. ती काही काळ प्रसिद्धही करण्यात येत होती. मात्र, सध्या ती उपलब्ध होत नाही. अतिउष्णतेमुळे होणाऱ्या मृत्यूंची नेमकी आकडेवारी मिळाल्यास, कोणत्याही कारणाने होणाऱ्या मृत्यूंची आकडेवारी तयार करून ती जाहीर केल्यास किती तापमान वाढल्यास अतिउष्णता, मृत्यूचा धोका वाढतो याचा अभ्यास करणे शक्य होऊ शकेल. त्यातून शाश्वत धोरणे तयार करता येऊ शकतील,’ असेही चुनेकर यांनी सांगितले.