महाराष्ट्र शासनाच्या ‘ई-गव्हर्नन्स स्पर्धेमध्ये पुणे विद्यापीठाला रौप्य पदक मिळाले आहे. विद्यापीठाच्या ‘पुणे युनिव्हर्सिटी नेटवर्क’ प्रकल्पासाठी हा पुरस्कार मिळाला आहे.
पुणे विद्यापीठामध्ये काही महिन्यांपूर्वी परीक्षा विभागातील ऑटोमेशन वरून गदारोळ झाला होता. मात्र, आता विद्यापीठाने सुरू केलेल्या त्याच प्रणालींना शासनाच्या ई-गव्हर्नन्स स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळाले आहे. शासकीय, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, महामंडळे, सहकारी संस्था या ठिकाणी ई-गव्हर्नन्सचा प्रभावी वापर करण्यात आला असल्यास शासनाकडून ई-गव्हर्नन्स पुरस्कार देण्यात येतो. दरवर्षी २० ऑगस्टला माहिती तंत्रज्ञान दिनाचे औचित्य साधून हे पुरस्कार जाहीर करण्यात येतात. पुणे विद्यापीठाच्या ‘पुणे युनिव्हर्सिटी नेटवर्क’ (पीयूएन) प्रकल्पाला आयटी फॉर एन्हायमेंट या गटात रौप्य पदक मिळाले आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
विद्यापीठाने २००९ मध्ये पुणे युनिव्हर्सिटी नेटवर्क प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पामध्ये गेल्या तीन वर्षांपासून महाविद्यालयांची संलग्नीकरण प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे. त्याचबरोबर विद्यार्थी पात्रता प्रक्रिया, ऑनलाइन प्रश्नपत्रिका पाठवणे, पदवीदान अर्ज भरण्याची प्रक्रिया, पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया दोन वर्षांपासून ऑनलाइन करण्यात आली आहे. ऑनलाइन परीक्षा अर्ज व पुनर्मूल्यांकनाची प्रक्रियाही वर्षभरापूर्वी ऑनलाइन करण्यात आली आहे. विद्यवाणी लाइव्ह रेडिओ, विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण अशा विविध कामे ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून करण्यात येत आहेत.
या प्रकल्पाच्या कार्यप्रणालीबाबत शासनाच्या समितीसमोर महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी सादरीकरण केले होते.