वरिष्ठ गुप्तवार्ता विभागाच्या महिला अधिकाऱ्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी ३१ जानेवारी रोजी हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून, शशिकांत खरात याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. तर सुरज नन्नावरे, आदित्य रोकडे, राहुल जाधव यांना सत्र न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अपहरणाचा प्रयत्न झालेली महिला अधिकारी सध्या राज्य गुप्तवार्ता विभागात कार्यरत आहे. अपहरण करण्यासाठी आलेला शशिकांत खरात याच्याशी काही वर्षांपूर्वी या महिला अधिकाऱ्याचे प्रेमसंबंध होते. मात्र, शशिकांत हा त्यांच्यावर संशय घेत असल्याने त्याच्यापासून दूर जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. त्यानंतर शशिकांतने परस्पर त्यांच्या बँक खात्यातून नऊ लाख रुपयांची रक्कम स्वतःच्या खात्यात वळवली होती, याप्रकरणी महिला अधिकाऱ्याने शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता.
त्यानंतर २९ जानेवारी २०१८ रोजी या महिला अधिकाऱ्याच्या घराबाहेर शशिकांत अचानकपणे आला आणि त्याने हात धरून त्यांना ओढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शेजाऱ्यांनी त्याला हकलून लावले. त्यानंतर त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्या महिलेचा मित्र रामकुमार शेडगे याच्याकरवी शशिकांतने महिला अधिकाऱ्याला बालेवाडी येथील ऑर्कड हॉटेल समोर बोलावून घेतले. तिथे त्यांचा अपहरण करण्याचा प्रयत्न तिने हाणून पाडला. मात्र, रामकुमारला ते घेऊन पसार झाले. त्यानंतर दुसऱ्यादिवशी हिंजवडी पोलिसांनी शशिकांतसह अन्य तिघांना अटक केली. परंतू, असाच गुन्हा संबंधीत महिला अधिकारी आणि रामकुमार यांच्यावर शशिकांतने यापूर्वीच मुंबईमध्ये दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नकुल हे करीत आहेत.