पुणे : राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे उद्या, मंगळवारी एकाच वेळी पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने दोन्ही गटांच्या समर्थकांकडून जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी सुरू करण्यात आली आहे. बदललेल्या राजकीय परिस्थितीनंतर या दोघांचा एकाच दिवशी होणारा हा पहिलाच दौरा असल्याने शहरातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

शिवसेनेतून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यावर राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर राजकीय पटलावर अनेक घडामोडी सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर प्रथमच हे दोघे पुण्यात एकाच दिवशी येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय बैठकांबरोबरच पक्षाचेही काही कार्यक्रम आहेत. तर आदित्य ठाकरे यांची कात्रज चौकात सायंकाळी पाच वाजता जाहीर सभा होईल.

पाऊस, अतिवृष्टी, पीक-पाणी आणि विकाससंदर्भातील कामांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी अकरा वाजता विभागीय आयुक्तांबरोबरच आढावा घेणार आहेत. त्यानंतर फुरसुंगी येथील पाणी योजना प्रकल्पाची पाहणी त्यांच्याकडून होईल. तीर्थक्षेत्र जेजुरी देवस्थानाला भेट दिल्यानंतर सासवड येथील पालखी तळ मैदानावर होणाऱ्या जाहीर सभेला शिंदे संबोधित करतील. त्यानंतर सायंकाळी हडपसर येथील फुटबाॅल मैदान आणि उद्यानाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून धनकवडी येथील शंकर महाराज मठालाही ते भेट देणार आहेत. त्यानंतर श्रीमंत दगडूशेट हलवाई गणपती मंदिरात महाआरती केल्यानंतर ते ठाण्याला रवाना होणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बदलल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा सध्या महाराष्ट्र दौरा सुरु आहे. त्यानुसार पुण्यातही त्यांची मंगळवारी जाहीर सभा शहर शिवसेनेकडून आयोजित करण्यात आली आहे. कात्रज चौक येथे सायंकाळी पाच वाजता ही सभा होणार असून शहर शिवसेनेकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जाहीर सभेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे काय बोलणार, याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुणे दौरा असल्याने आदित्य ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.