वैयक्तिक नाव न देण्याच्या ठरावाला केराची टोपली

पुणे : महापालिकेच्या उद्यानाला नगरसेवकांच्या कुटुंबीयांची नावे देण्यात येऊ नयेत. राष्ट्रीय नेते, वनस्पती शास्त्रज्ञ आणि पर्यावरण शास्त्रज्ञांची नावेच उद्यानाला द्यावीत, असा महापालिकेच्या मुख्य सभेचा ठराव असतानाही तो डावलून हडपसरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने शिवसेनेच्या (शिंदे गट) माजी नगरसेवकाने उद्यान विकसीत केले आहे. विशेष म्हणजे या उद्यानाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच हस्ते होणार आहे. त्यामुळे उद्यानाचे उद्घाटन वादात सापडण्याची शक्यता असून शहरातील स्वयंसेवी संस्थांनी त्याला विरोधी सुरू केला आहे. या वैयक्तिक नामकरण केलेल्या उद्यानाचे उद्घाटन एकनाथ शिंदे करणार का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

महापालिकेच्या मुख्य सभेने २४ जुलै २००० मध्ये उद्यानांना देण्यात येणाऱ्या नावांबाबत ठराव केला आहे. या ठरावानुसार महापालिकेच्या उद्यानांना नाव देताना वैयक्तिक नावे देता येत नाहीत. राष्ट्रीय नेते, पर्यावरणशास्त्रज्ञ आणि वनस्पती शास्त्रज्ञांची नावे उद्यानांना देण्यास परवानगी आहे. मात्र सर्वपक्षीय नगरसेवकांकडून त्यांच्या कुटुंबियांची नावे उद्यानांना आणि अन्य वास्तूंना दिली जात आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी गुलटेकडी भागातील सॅलिसबरी पार्क येथील उद्यानाचा भाजपच्या नगरसेवकाने त्यांच्या वडीलांचे नाव दिले होते. त्याविरोधात सॅलिसबरी पार्क कृती समितीने आक्षेप घेत त्याविरोधात लढा सुरू केला आहे. ही घटना ताजी असतानाच शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहर प्रमुख म्हणून नियुक्त केलेले प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांनी हडपसर परिसरात उद्यान विकसीत केले आहे. या उद्यानाला त्यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव दिले आहे. मूळातच महापालिकेचा ठरावाला केराची टोपली दाखवत नाव देण्यात आले आहे. आता या उद्यानाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तेच होणार असल्याने त्याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, उद्यान विकसीत करण्यात आलेली जागा महापालिकेची आहे. मात्र एका खासगी विकसाकडून ते विकसीत करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणाऱ्या या उद्घाटन वादात सापडण्याची शक्यता आहे.

शहरातील ८२ उद्यानांना वैयक्तिक नावे

शहरातील ८२ उद्यानांना नगरसेवकांनी त्यांच्या कुटुंबीयांची नावे दिली आहेत. माहिती अधिकाऱ्याच्या तपशीलातून ही बाब उघडकीस आली आहे. ही बाब पुढे आल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून विधी विभागाकडून अभिप्राय मागविला आहे. त्यामध्ये नावे बदलण्याचे नमूद करण्यात आले आहे.

उद्यानांना कुटुंबियांची नावे देण्याची पद्धत चुकीची आहे. महापालिकेच्या ठरावाविरोधात नावे दिली जात आहेत. सॅलिसबरी पार्क उद्यानालाही असेच नाव देण्यात आले होते. त्याविरोधात नागरिकांचा लढा सुरू आहे. हडपसर येथील उद्यानालाही एकनाथ शिंदे यांचे नाव देण्याला विरोध आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– विनिता देशमुख, सामाजिक कार्यकर्त्या