लोकसत्ता वार्ताहर
शिरूर : शिरुर येथील इनाम गावातील नलगेमळ्यात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात घराच्या बाहेर ओट्यावर झोपलेल्या ९० वर्षांच्या ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला. शुक्रवारी पहाटे ही घटना घडली.
लक्ष्मीबाई बबन भोईटे असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. त्या घराच्या ओट्यावर झोपल्या होत्या. पहाटे बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. लक्ष्मीबाई यांनी आरडाओरडा केल्यानंतर त्यांच्या मुलाने खिडकीतून डोकावून पाहिले असता बिबट्या त्यांच्या आईला घेऊन उसाच्या शेतात गेल्याचे दिसले. स्थानिक ग्रामस्थांचा मदतीने ज्येष्ठ महिलेचा शोध घेण्यात आला. शेतात त्या मृतावस्थेत आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.
गेल्या काही दिवसापासून नलगेमळा येथे बिबट्याचा वावर वाढला आहे. वन विभागाचा वतीने या भागात बिबटे जेरबंद करण्यासाठी ५ पिंजरे लावण्यात आले आहेत. सहाय्यक वनसरंक्षक स्मिता राजहंस आणि तालुका वनपरीक्षेत्र आधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केल्याचे वनखात्याचे भानुदास शिंदे यांनी सांगितले.
गेल्या वर्षभरात बिबट्यांचा हल्ल्यात तीन लहान मुलांना प्राण गमवावे लागले आहे . १९ ऑक्टोबर २०२४ रोजी वंश सिंग, १५ नोव्हेंबर २०२४ रोजी टेभेकर वस्ती येथील शिवतेज टेंभेकर आणि २४ डिंसेबर २०२४ रोजी रक्षा निकम या चिमुकल्यांना प्राण गमवावे लागले आहेत. श्वान, शेळ्या, मेंढ्या यांच्यावर बिबट्यांकडून सातत्याने हल्ले होत आहेत. हल्ले झाल्यावर बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरे लावणे, गस्त यांसारखे उपाय काही दिवस केले जातात. बिबट्यांचा हल्ल्याने नागरिक भयभीत झाल्याने या भागातील शेतीसह दैनंदिन कामावरही परिणाम झाला असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव आणि खेड या भागात काही वर्षापासून बिबट्यांचा वावर होता. आता शिरूर तालुक्यातही वावर सुरू झाला आहे. पूर्वी शिरूर तालुक्यातील जांबूत, पिंपरखेड, टाकळी हाजी, फाकटे, कवठे येमाई या बेट परिसरात बिबट्याचा वावर होता. आता मांडवगण फराटा, वडगाव रासाई, पिंपळसुटी, इनामगाव, न्हावरा या पूर्व भागात ही मोठ्या प्रमाणावर बिबटे आढळून येत आहेत.
शिरूर तालुक्यात डिंभा आणि चासकमान कालव्याचे पाणी, विविध नद्यांमुळे बागायती क्षेत्र वाढले आहे. तसेच उसाचे पीक मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. ऊस क्षेत्र हे बिबट्याचा वास्तव्यासाठी अनुकूल ठरत आहे. या परिसरात बिबट्यांची संख्या वाढली असून भक्ष्य न मिळाल्यास बिबट्या हे मानवी वस्तीकडे येऊ लागले आहेत. यामुळे बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.