अनधिकृत बांधकामे, शास्तीकर, रेडझोन, पूररेषा, एलबीटी, महापालिकेतील भ्रष्टाचार, समाविष्ट गावांमधील समस्या या स्थानिक मुद्दय़ांसह राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचा गेल्या १५ वर्षांतील भ्रष्ट व निष्क्रिय कारभार हे मुद्दे घेऊन जनतेसमोर जाणार असून राष्ट्रवादीची तसेच अजितदादांची ‘दादा’गिरी मोडून काढू, असा विश्वास शहर भाजपने शनिवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
भोसरीचे उमेदवार एकनाथ पवार, पिंपरीच्या चंद्रकांता सोनकांबळे, चिंचवडचे लक्ष्मण जगताप यांच्या प्रचाराची पहिली फेरी पूर्ण झाल्याची माहिती शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पवार म्हणाले, राष्ट्रवादी हाच प्रमुख प्रतिस्पर्धी असून त्यांचा नायनाट करू. विलास लांडे भाजपमध्ये येण्यास उत्सुक होते. त्यांनी माझी उमेदवारी बसवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जगताप म्हणाले, दिल्ली व गुजरातमध्ये भाजपने अनधिकृत बांधकामांचा प्रश्न सोडवला, त्याच धर्तीवर पिंपरीतील प्रश्न सुटेल. सत्ताधारी आघाडी सरकारने जनतेची फसवणूक केली. मुख्यमंत्र्यांनी अनेकदा जाहीर घोषणा केली. मात्र, कृती केलीच नाही. खाडे म्हणाले, भाजप दुभंगली नाही व पक्षात गटतट नाहीत.
नरेंद्र मोदी गुरुवारी पिंपरीत
भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ पिंपरीतील एचए कॉलनीच्या मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नऊ ऑक्टोबरला (गुरुवारी) जाहीर सभा होणार आहे. त्या दृष्टीने भाजप पदाधिकाऱ्यांनी शनिवारी मैदानाची पाहणी केली. पिंपरीच्या राजकारणातून अजित पवार यांच्या दादागिरीला सुरुंग लावणार असून त्याची सुरुवात मोदींच्या सभेपासून होईल, असे भाजपने म्हटले आहे.