पुणे : मतदार याद्यांतून नावे गायब होण्यासंदर्भात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जोरदार आरोप, प्रत्यारोप सुरू आहेत. निवडणूक आयोगाला हाताशी धरून केंद्रात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या हितासाठी लाखो नागरिकांची मतदार यादीतून नावे काढून टाकण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.
मतदार यादीतून नावे काढताना आवश्यक ती प्रक्रिया पार पाडावी लागते. त्यानंतरच मतदारयादीतून नावे वगळली जातात. मतदार यादीतून नावे काढून टाकताना त्यासाठीची प्रक्रिया पूर्णपणे अवलंबली गेली किंवा नाही याचा तपास केला तर यामधील तथ्य बाहेर येणार आहे. त्यामुळे मतदार यादीतून नावे गायब होण्यामागे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात वेळ न घालवता, मतदार यादीतून नावे काढून टाकताना आवश्यक ती संपूर्ण प्रक्रिया निवडणुकीचे काम करणाऱ्या यंत्रणेने योग्य पद्धतीने पूर्ण केली का? याचा शोध घ्यावा, असे आवाहन सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष वेलणकर यांनी केले आहे.
मतदार याद्यांमधून नावे वगळली जाण्याबाबत सध्या देशभर चर्चा सुरु आहे. काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी चार दिवसांपूर्वी पत्रकार पत्रकार परिषद घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने अनेक राज्यात मधील मतदार यादीतील नावे काढून टाकल्याचा आरोप केला आहे.
जिवंत असलेल्या नागरिकांना मयत दाखवून परस्पर त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आल्याचा गंभीर आरोप गांधी यांनी केला आहे. निवडणूक आयोग हा केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपाच्या मनाप्रमाणे वागत असल्याचे सुतोवाच देखील यानिमित्त केले जात असून गेल्या दोन-तीन दिवसांपासून यावरून विरोधक आणि सत्ताधारी पक्षाचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून टीकेची झोड उठवीत आहे.
मतदार यादीतून नावे रद्द करण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करावी लागते, जी नावे मतदार यादीतून काढून टाकण्यात आली आहेत ती काढताना निवडणूक आयोगाने दिलेली प्रक्रिया संबंधित निवडणूक यंत्रणेने पूर्ण केली की नाही? याची शहानिशा होणे गरजेचे आहे. त्यामुळे ज्या नागरिकांची नावे काढून टाकण्यात आली आहे. त्यासाठी कोणती प्रक्रिया झाली याची माहिती घ्यावी, अशी मागणी वेलणकर यांनी केली आहे.
मतदार यादीतून नाव रद्द करताना कोणती प्रक्रिया पूर्ण करावी लागते? याची माहिती निवडणूक आयोगानेच माहितीच्या अधिकारात दिली असल्याचा दावा वेलणकर यांनी केला. मतदार यादीतून नावे वगळताना, काय केले पाहिजे, याच्या सूचना निवडणूक आयोगाने सर्व राज्यांना दिलेल्या आहेत. याची अंमलबजावणी करून त्यानंतरच नाव वगळता येते.
मतदार यादीतून कधी नाव वगळता येते?
१) निवडणूक यादीतून दुबार नावनोंदणी किंवा मतदारांचा पत्ता बदलणे किंवा मतदारांचा मृत्यू यापैकी कोणत्याही कारणाने नाव वगळता येते.
२) मात्र यापैकी कोणत्याही कारणाने नाव वगळताना अर्ज (फॉर्म) ७ भरुन घेतलाच पाहिजे.
३) मतदाराला नाव वगळण्यापूर्वी रजिस्टर पत्राने फॉर्मेट एक प्रमाणे संबंधित मतदाराला नोटीस दिलीच पाहिजे.
४) या नोटीशीनंतर यासंदर्भात आपले म्हणणे मांडण्यासाठी संबंधित मतदाराला १५ दिवसांची मुदत द्यावी लागते.
५) मतदाराने १५ दिवसांत प्रतिसाद दिला नाही तर मतदार नोंदणी अधिकारी ( बूथ लेव्हल ऑफिसर) यांनी मतदाराच्या पत्त्यावर स्वतः जाऊन खात्री करावी आणि नंतरच बीएलओ च्या अहवालाच्या आधारावर फाॅर्म ७ नसतानाही मतदाराचे नाव यादीतून वगळता येते.
६) मयत व्यक्तीचे नाव मतदारयादीतून वगळायचे असेल बीएलओ ने स्वतः जाऊन खात्री करून घ्यावी आणि मग फॉर्म ७ तसेच बीएलओचा अहवाल या आधारे मृत व्यक्तीचे नांव मतदारयादीतून वगळता येते.