डोक्यावर पक्षाच्या ध्वजाप्रमाणे फेटा आणि हातात पक्षाचा झेंडा अशा थाटात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिलांनी बुधवारी कसबा विधानसभा मतदारसंघात प्रचारात भाग घेतला आणि प्रचारात उत्साह निर्माण केला.
पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह, ढोल-ताशांचा गजर आणि महिलांची लक्षवेधी उत्साही उपस्थिती यामुळे मनसेचे उमेदवार दीपक पायगुडे यांची कसब्यातील पदयात्रा बुधवारी लक्षवेधी ठरली. नगरसेविका रुपाली पाटील, अनिता डाखवे, संगीता तिकोने, सुशीला नेटके यांच्यासह तीनशे महिला मनसेचे फेटे बांधून या पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या. नगरेसवक रवींद्र धंगेकर, विभागप्रमुख रवींद्र खेडेकर, तसेच उषा काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. मतदारांबरोबर थेट संवाद साधत पायगुडे यांनी या वेळी परिसरातील नागरिकांचे प्रश्न समजून घेतले.
पर्वती मतदारसंघातही पायगुडे यांच्या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पदयात्रेला प्रारंभ करण्यात आला. पक्षाचे गटनेता वसंत मोरे, नगरसेवक राहुल तुपेरे, युगंधरा चाकणकर, अस्मिता शिंदे, तसेच अप्पा अमराळे, अशोक मेहेंदळे, संदीप शिंदे, शिवाजी गदादे यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. बिबवेवाडी, सातववस्ती, महेश सोसायटी, अपर इंदिरानगर, संभाजीनगर, चव्हाणनगर येथून या भागात ही पदयात्रा आयोजित करण्यात आली होती.