मावळ लोकसभेच्या रणांगणात अपेक्षेप्रमाणे ‘उल्टा-पुल्टा’ चे राजकारण झाले. पक्षनिष्ठा, आघाडी धर्म खुंटीला टांगून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी वैयक्तिक संबंधांना तसेच नात्यागोत्याला प्राधान्य दिले. राष्ट्रवादीच्या घडय़ाळाचे बारा वाजवून राष्ट्रवादी तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘कपबशी’ आणि ‘धनुष्यबाणा’चा उघडउघड प्रचार केला. गावोगावी झालेले ‘क्रॉस वोटिंग’ आणि पैशाचा बाजार यामुळे मतांचे मोठय़ा प्रमाणात ध्रुवीकरण झाले असून निकालाबाबतची उत्कंठा आणखी वाढली आहे.
मावळात भाजप, शिवसेना व रिपाइंचे श्रीरंग बारणे, शेकाप-मनसेचे लक्ष्मण जगताप, राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीचे राहुल नार्वेकर यांच्यासह १९ उमेदवार रिंगणात होते. तथापि, ज्या पद्धतीने मतदान झाले, त्यावरून मुख्य लढत बारणे व जगताप यांच्यातच झाल्याचे दिसून येते. सहाही मतदारसंघात कार्यकर्त्यांनी पक्षाकडे काहीही पाहिले नाही. आघाडी धर्म पायदळी तुडवला. दोन्ही काँग्रेसचे कार्यकर्ते कपबशी त्याच पद्धतीने धनुष्यबाणही चालवताना दिसत होते. पक्षनिहाय मतदान होणे अपेक्षित असताना उमेदवाराशी असलेला थेट संबंध व पाहुण्या-रावळ्यांच्या गणितानुसार मतदान झाले. त्यामुळे गावोगावी उभे गट पडल्याचे दिसून आले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी जगताप यांच्यावर कडक शब्दात टीका केली. ‘दिवसा एक व रात्री एक’ असा प्रचार करू नका, असा इशाराही त्यांनी सातत्याने दिला. तरीही राष्ट्रवादीचे बहुतांश नगरसेवक व कार्यकर्ते जगतापांचा खुलेपणाने प्रचार करत राहिले. जगतापांच्या विरोधात असणारे नेते तसेच राष्ट्रवादीतील विरोधी गटातील माजी महापौर, नगरसेवक व पक्षातील पदाधिकारी वरवर घडय़ाळाचा प्रचार केल्याचे दाखवत होते. प्रत्यक्षात त्यांनी बारणे यांना हातभार लावला. या सर्व घडामोडीत आघाडीचे उमेदवार नार्वेकर यांची चांगलीच कुचंबणा झाली. त्यांचे बूथ नव्हते तसेच अपेक्षित ‘पोलिंग एजंट’ मिळाले नव्हते. मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादीच्या कचेरीतून त्यांच्याच विरोधात प्रचार झाल्याचे दिसून येत होते. मारुती भापकर, टेक्सास गायकवाड यांनी अधिकाधिक मतदान घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना मर्यादा पडत असल्याचे चित्र होते. शेवटच्या दोन दिवसांत झालेल्या नाटय़मय घडामोडी, डावपेच, पैशांचा धूर यासारखे घटक निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.