अभियांत्रिकी, औषधनिर्माण, व्यवस्थापन क्षेत्रातील पन्नास टक्क्य़ांहून अधिक उच्चशिक्षीत रोजगाराविना
शिक्षणाच्या उंचीनुसार रोजगारसंधी हा सार्वकालिक नियम गेल्या तीन वर्षांत पूर्णपणे बदलून गेल्याचे दिसत असून प्रतिष्ठेच्या अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन अभ्यासक्रमातील पदवी किंवा अगदी पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणारे पन्नास टक्क्यांहून अधिक विद्यार्थी नोकरीविना राहिले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिक्षणावर आफाट खर्च आणि वयाची महत्त्वाची वर्षे घालवूनही निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांना बेरोजगारीच्या गर्तेत जावे लागत असल्याचे शासकीय आकडेवारीतून समोर आले आहे.
तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या दर्जाची चर्चा गेली काही वर्षे देशात सातत्याने होत आहे. त्या पाश्र्वभूमीवर अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने महाविद्यालयांकडून पायाभूत सुविधांची माहिती गोळा केली. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या रोजगाराचीही (प्लेसमेंट्स) माहिती गोळा करण्यात आली. कॅम्पस मुलाखती किंवा इतर माध्यमातून महाविद्यालयातील किती विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर नोकरी मिळाली त्याची माहिती महाविद्यालयांनी द्यायची होती. देशभरातून १६ मेपर्यंत गोळा झालेल्या माहितीनुसार यंदा देशभरातील अभियांत्रिकी पदवी घेतलेल्या साधारण ४२ टक्के विद्यार्थ्यांना, औषधनिर्माणशास्त्रातील पदवी घेतलेल्या अवघ्या २० टक्के विद्यार्थ्यांना आणि व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी घेतलेल्या ३९ टक्केच विद्यार्थ्यांनाच रोजगार मिळू शकला आहे. राज्यातील स्थिती आणखीच ढासळलेली आहे. राज्यात अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम (३५ टक्के), औषधनिर्माणशास्त्र पदवी (१५ टक्के), व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम (४३ टक्के) विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या संधीमध्ये घट झाली आहे.
अभियांत्रिकीची दु:स्थिती
अभियांत्रिकी अभ्यासक्रमांची स्थिती गेली अनेक वर्षे ढासळत गेली आहे. त्याचबरोबर आता रोजगाराच्या संधीही घटल्या आहेत. गेल्या वर्षी (२०१५-१६) देशभरात अभियांत्रिकीची पदवी घेतलेल्या ८ लाख ५० हजार ५२५ विद्यार्थ्यांपैकी अवघ्या ४२ टक्के म्हणजेच ३ लाख ६१ हजार १६ विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली, तर यंदा (२०१६-१७) ३ लाख २४ हजार ३१६ विद्यार्थ्यांनाच नोकरी मिळू शकली. गेल्या वर्षीच्या तुलनेत ३६ हजार ७०० नोकऱ्या कमी झाल्या. पदविका अभ्यासक्रमातही गेल्या वर्षीच्या तुलनेत ३ हजार ४५३ नोकऱ्या कमी झाल्या. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची स्थिती अधिकच वाईट आहे. अभियांत्रिकी शाखेतील पदव्युत्तर पदवी घेणाऱ्या अवघ्या २५ टक्के विद्यार्थ्यांनाच गेली दोन वर्षे नोकरी मिळू शकली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नोकरी मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ६ हजार ६८४ ने कमी झाली आहे. राज्यात पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ३६ हजार ५४८ विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली होती, तर यंदा ३० हजार ९६२ विद्यार्थ्यांनाच नोकरी मिळू शकली आहे. पदविका आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम करणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ८ ते ११ टक्केच विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळाल्या आहेत.
औषधनिर्माणाची जर्जरावस्था
औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या मनुष्यबळाच्या मागणीत गेल्या काही वर्षांत मोठा फरक पडलेला नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत देशात २ ते ३ हजारांनी नोकरीच्या संधी कमी झाल्या आहेत. मात्र संस्थाचालकांनी गेल्या काही वर्षांत औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाकडे मोर्चा वळवला आहे. पदविका, पदवी किंवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढते आहे. मात्र त्या तुलनेत रोजगाराच्या संधींमध्ये फारशी वाढ झालेली नाही. त्यामुळे उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी नोकरी मिळू शकलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी कमी आहे. देशात गेल्यावर्षी (२०१५-१६) पदविका घेतलेल्या १७.४८ टक्के विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली होती, तर यंदा (२०१६-१७) १३.३६ टक्केच विद्यार्थ्यांना नोकरी मिळू शकली आहे. पदवी घेतलेल्या २५.१४ टक्के विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी नोकरी मिळू शकली, तर यंदा हे प्रमाण २०.०१ टक्क्यांवर आले आहे. पदव्युत्तर पदवी घेतलेल्या ४३.४३ टक्के विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी, तर ४०.८२ टक्के विद्यार्थ्यांना यंदा नोकरी मिळू शकली आहे. राज्यात गेल्या वर्षी (२०१५-१६) पदविका घेतलेल्या १३.७२ टक्के विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली होती, तर यंदा (२०१६-१७) ७.५९ टक्केच विद्यार्थ्यांना नोकरी मिळू शकली आहे. पदवी घेतलेल्या २३.८० टक्के विद्यार्थ्यांना गेल्यावर्षी नोकरी मिळू शकली, तर यंदा हे प्रमाण १४.९६ टक्क्यांवर आले आहे. पदव्युत्तर पदवी घेतलेल्या ४८.०५ टक्के विद्यार्थ्यांना गेल्यावर्षी, तर ४३.१७ टक्के विद्यार्थ्यांना यंदा नोकरी मिळू शकली आहे.
व्यवस्थापनाची दुर्दशा
व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी म्हणजेच एमबीए किंवा एमएमएस अभ्यासक्रमांचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही फटका बसला आहे. गेल्या वर्षीच्या (२०१५-१६) तुलनेत नोकरी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या देशपातळीवरील संख्येत यंदा (२०१६-१७) १२ हजार २२० ने घट झाली आहे. गेल्या वर्षी १ लाख १ हजार ६०९ विद्यार्थ्यांना नोकरी मिळू शकली होती. मात्र यंदा ही संख्या ८९ हजार ३८९ आहे. राज्यातील १७ हजार ७६ विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी नोकरी मिळू शकली होती. मात्र, यंदा १४ हजार ८९५ विद्यार्थ्यांनाच नोकरी मिळाली आहे.
