विद्याधर कुलकर्णी

संदर्भमूल्य असलेल्या कोशांमधील माहितीचा शोध कसा घ्यावयाचा, याचे लेखक आणि अभ्यासकांना मार्गदर्शन करण्यासाठी कोशांचा कोश हा अभिनव प्रकल्प पुण्यामध्ये साकारला जात आहे. सव्वाशे वर्षांच्या महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेने हा प्रकल्प हाती घेतला असून यामुळे कोणत्याही विषयातील माहिती अभ्यासकांना सहजगत्या उपलब्ध होऊ शकेल. अशा स्वरूपाचा हा मराठीतील पहिलाच प्रकल्प आहे.

याबाबत कोशाचे संकल्पक आणि संस्थेचे सहकार्यवाह डॉ. अविनाश चाफेकर म्हणाले, राज्य मराठी विकास संस्थेने कोश वाङ्मयाची सूची प्रसिद्ध केली आहे; परंतु उपयुक्ततेच्या दृष्टीने सूची हा प्रकार अपुरा वाटतो. सूची ही पत्त्यापुरती मर्यादित आहे; पण केवळ पत्ता देऊन गोष्ट सापडत नाही. त्यासाठी जवळची खूण सांगावी लागते.

तसाच सूची आणि कोश यातील फरक आहे. ‘कोशांचा कोश’मध्ये ज्या कोशाची नोंद करण्यात आली आहे त्याचे लेखक, प्रकाशक, प्रकाशन वर्ष, आवृत्ती, मूल्य यासह संबंधित कोश कोणत्या ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहे ही प्राथमिक माहिती तर आहेच; पण त्याचबरोबर त्या कोशात समाविष्ट असलेल्या माहितीचा गोषवारा देण्यात आला आहे. त्यामुळे विशिष्ट माहिती संकलित करण्यासाठी ग्रंथालये धुंडाळण्याची वेळ अभ्यासकांवर येणार नाही.

‘कोशांचा कोश’मध्ये २३० कोशांच्या नोंदी झाल्या आहेत. टाळेबंदीमुळे महाविद्यालये बंद असल्याने अजून नवीन कोशांची माहिती समजत नसल्याने हा प्रकल्प कधी पूर्णत्वास जाईल, हे सध्या सांगणे अवघड आहे. या कामामध्ये निवृत्त अभियंते अनंत वेलणकर यांचे सहकार्य लाभत आहे.

वेगवेगळ्या ग्रंथालयांना भेट देऊन तेथील कोशांचे नाव, आवृत्ती, प्रकाशन मूल्य, प्रस्तावना किंवा संपादकीय या पानांच्या झेरॉक्स प्रती आणून देण्याकामी त्यांनी पुढाकार घेतला आहे. तर कोशसंग्राहक रवींद्र ठिपसे यांनी त्यांच्याकडील अडीचशेहून अधिक कोशांची माहिती, कोशासंदर्भातील बातम्यांची कात्रणे ही साधनसामग्री दिली आहे.

गरज का?

कोश वाङ्मय हे कोणत्याही भाषेतील वाङ्मयाचा महत्त्वाचा भाग असतो. मराठीतील कोश वाङ्मय समृद्ध आहे; पण त्याचा वापर कसा करावयाचा याची अनेकांना माहिती नसते. लेखक आणि अभ्यासकांना माहिती मिळविणे सुलभ व्हावे या उद्देशातून कोशांचा कोश करण्याची संकल्पना आकाराला आली, अशी माहिती या कोशाचे संकल्पक आणि संस्थेचे सहकार्यवाह डॉ. अविनाश चाफेकर यांनी दिली.

उपयोग कसा?

कोशांचे प्रामुख्याने दोन प्रकार करता येतात. शब्दकोश म्हणजे शब्दार्थकोश ज्याला पर्यायी शब्दकोश म्हटले जाते आणि दुसरा म्हणजे ज्ञानकोश. खरं तर, शब्दकोश आणि ज्ञानकोश या दोन्हीपेक्षा कोशांचा कोश हा वेगळाच तिसरा प्रकार आहे. यामध्ये शब्दकोशाप्रमाणे शब्दार्थ दिलेले नाहीत. तसेच विशिष्ट विषयावर माहिती संकलन करून दिलेली नाही. हे कोशांचे संकलन आहे आणि संकलित कोशांची ओळख करून दिली आहे. याद्वारे विशिष्ट कोश कितपत उपयुक्त आहे आणि तो कोठे उपलब्ध होऊ शकेल, हे अभ्यासकांना समजू शकेल.