पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा नदीच्या सुशोभीकरणासाठी अडथळा ठरणारी एक हजार झाडे तोडण्यास एक हजार नागरिकांनी हरकतींद्वारे विरोध दर्शविला आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाने घेतलेल्या सुनावणीत नागरिकांनी झाडे तोडण्यास तीव्र विरोध केला.
महापालिकेच्या पर्यावरण विभागाने उद्यान विभागाकडे मुळा नदी प्रकल्पातील वाकड बायपास ते सांगवी पुलापर्यंतच्या नदीकाठावरील झाडे हटविण्यासाठी तसेच, काही झाडांचे पुनर्रोपण करण्याचा प्रस्ताव दिला आहे. मुळा नदीच्या काठावर एकूण सहा हजार ८४६ झाडे आहेत. त्यांपैकी तीन हजार ५८५ झाडे वाचवली जाणार आहेत, तर दोन हजार २५२ झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. एक हजार झाडे तोडली जाणार आहेत. त्यात करंज, चिंच, बाभूळ आणि जंगली एरंडोल यांसारख्या स्थानिक प्रजातींचा समावेश आहे. त्याला शहरातील नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.
सात दिवसांत ८०० ऑनलाइन आणि २०० लिखित अशा एकूण एक हजार हरकती आल्या आहेत. त्यावर उद्यान विभागाच्या नेहरुनगर येथील कार्यालयात नागरिकांची सुनावणी घेण्यात आली. महापालिकेचे मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे यांनी ही सुनावणी घेतली. नागरिकांनी झाडे तोडण्यास तीव्र विरोध केला.
महापालिकेकडून मुळा नदीसुधार प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. मुळा नदीकाठाच्या बाजूंनी काँक्रिटचे बांधकाम, सायकल पदपथ, चालण्यासाठी मार्ग आणि इतर नागरी सुविधा उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे हजारो झाडांचा बळी जाईल, असा पर्यावरणप्रेमींचा आक्षेप आहे. नदीसुधारच्या नावाखाली नद्यांचे नैसर्गिक स्वरूप नष्ट करून काँक्रीटचा अतिरेक केला जात आहे. त्यामुळे जैवविविधता आणि स्थानिक हवामानाला धोका निर्माण होणार आहे, अशी तक्रार पर्यावरणप्रेमींनी सुनावणीत केली.
प्रशासनाकडून एकही झाड तोडण्यास परवानगी दिली नसल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात हजारो झाडे तोडून नदीसुधारचे काम सुरू आहे. हरकतींसाठी केवळ सात दिवस देण्यात आले. नदीकाठी वनस्पती, पानथळ जागा, दीडशे प्रकारचे पक्षी असून, हे जंगल आहे. ही सर्व प्रक्रिया रद्द करावी. नव्याने हरकती मागवाव्यात.
मुळा नदीसुधार प्रकल्पात बाधित होणारी झाडे, तसेच पुनर्रोपणासंदर्भात नागरिकांच्या हरकतींची नोंद घेण्यात आली आहे. आता त्या विचाराधीन ठेवून अंतिम निर्णय घेतला जाईल.- महेश गारगाेटे, वृक्षाधिकारी, उद्यान विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका