महापालिकेच्या मालकीच्या शहरातील विविध अठरा वाहनतळांवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले आहेत. या प्रकल्पातून होणाऱ्या वीज निर्मितीचा वापर ई-वाहने चार्जिंग करण्यासाठी केला जाणार आहे. त्यासंदर्भातील प्रायोगिक तत्वावरील प्रकल्प पुणे रेल्वे स्थानक परिरातील वाहनतळापासून सुरू करण्यात येणार आहे.

पर्यावरण संवर्धनासाठी महापालिकेने विजेवर धावणाऱ्या गाड्या वापरण्यास सुरुवात केली आहे. ई-वाहनांच्या वापराचे धोरण निश्चित केले असले तरी चार्जिंग स्थानकांअभावी या वाहनांचा पूर्ण क्षमतेने वापर करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे सौर ऊर्जेच्या माध्यमातून ई-चार्जिंगचा प्रयोग महापालिका राबविणार आहे.महापालिकेची शहराच्या विविध भागात बहुमजली वाहनतळ आहेत. वाहनतळाच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे शक्य आहे. त्यासंदर्भात शहरातील वाहनतळांची पाहणी करण्यात आली. प्रायोगिक तत्त्वावर पुणे रेल्वे स्थानक परिसरातील तुकाराम शिंदे वाहनतळ येथे हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहे. टप्प्याटप्याने त्याची अंमलबजावणी अन्य वाहनतळांसंदर्भात केली जाईल. त्याबाबतचा अंतिम आराखडा तयार झाला आहे, अशी माहिती महापालिकेच्या विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदूल यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ई-वाहने वापरण्यासंदर्भात महापालिकेत स्वतंत्र विभाग कार्यान्वित करण्यात आला आहे. महापालिकेच्या कामाकाजासाठी, पाहणी दौऱ्यासाठी या वाहनांचा वापर होत आहे. मात्र चार्जिंग स्थानके नसल्याने महापालिकेच्या वाहनांना पिंपरी-चिंचवड येथील भोसरी या ठिकाणी जावे लागत आहे. त्यामुळे त्यावर मार्ग शोधला जात आहे. पुणे रेल्वे स्थानक परिसरातील वाहनतळावर तीनशे किलोवॅट क्षमता असलेला सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या वाहनतळालगतच पीएमपीचे आगार असून विजेवर धावणाऱ्या गाड्या (ई-बस), दुचाकी, चारचाकी वाहनांचे चार्जिंग करता येणे शक्य होणार आहे.