लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : व्यवस्थापनशास्त्र पदवी (बीबीए, बीएमएस), संगणक उपयोजन (बीसीए) पदवी अभ्यासक्रमांच्या समाईक प्रवेश परीक्षेसाठी (सीईटी) ४८ हजार १८२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मात्र या परीक्षेच्या नोंदणीसाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षाने घेतला आहे.
एमबीए, एमसीए या व्यावसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या धर्तीवर बीसीए, बीबीए, बीएमएस हे पदवी अभ्यासक्रम आपल्या अखत्यारित घेण्याचा निर्णय अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) घेतला. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची सीईटी राज्य सीईटी सेलकडून घेण्यात येते. त्याच धर्तीवर बीसीए, बीबीए, बीएमएस या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीही प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेतील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया होणार आहे. त्यानुसार बीबीए, बीसीए, बीएमएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या सीईटीची नोंदणी सुरू करण्यात आली. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी अनिवार्य आहे. मात्र राज्यात पहिल्यांदाच होणाऱ्या या परीक्षेबाबत अद्याप फारशी जागृती नसल्याने नोंदणीसाठी मुदतवाढ देण्याची गरज शिक्षण क्षेत्रातून व्यक्त करण्यात आली होती.
आणखी वाचा-Video: …अन् आशिष शेलार म्हणाले, “सुनेत्रा पवारांचा पराभव होणार!”
राज्य सीईटी सेलचे आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी दिलेल्या माहितीनुसार बीबीए, बीएमएस, बीसीए अभ्यासक्रम प्रवेश सीईटीसाठी ४८ हजार १८२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मात्र, नोंदणीसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता विद्यार्थ्यांना ३० एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे. तसेच एमबीए, एमसीए एकात्मिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठीची ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. बीबीए, बीएमएस, बीसीए अभ्यासक्रम, मबीए, एमसीए एकात्मिक अभ्यासक्रम सीईटी २७ ते २९ मे या कालावधीत होणार आहे.
‘नर्सिंग’साठी ५४ हजार ४१३ विद्यार्थ्यांनी नोंदणी
सीईटी सेलने दिलेल्या माहितीनुसार, बीएस्सी नर्सिंग या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी ५४ हजार ४१३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या अभ्यासक्रमाच्या सीईटीच्या नोंदणीसाठी २५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.