पुणे : दोन तुकडय़ांत एफआरपी देण्याचा कायदा रद्द करून एकरकमी एफआरपी द्या. साखर कारखान्यांची काटामारी संपुष्टात आणण्यासाठी साखर कारखान्यांचे वजनकाटे ऑनलाइन करा. थकीत एफआरपी तातडीने द्या, आदी मागण्यांसाठी सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली साखर आयुक्तालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाची सुरुवात अलका टॉकीज चौकातून झाली.

राजू शेट्टी म्हणाले, ‘मागील अनेक वर्षांपासून आर्थिकदृष्टय़ा अडचणीत आलेले कारखाने मागील हंगामापासून फायद्यात आले आहेत. त्यामुळे दोन तुकडय़ांत एफआरपी देण्याचा निर्णय रद्द करावा, एफआरपी एकरकमी मिळावी. बहुतांश कारखान्यांवर काटामारी होते, त्यामुळे कारखान्यांचे वजन काटे ऑनलाइन करावेत. मागील वर्षांची एफआरपी अनेक कारखान्यांनी दिली आहे. पण, काही कारखान्यांची एफआरपी बाकी आहे, एफआरपी अधिक दोनशे रुपये तातडीने द्या. कारखाने आणि शेतकरी यांची ऊसतोडणी मजुरांच्या मुकादमांकडून आर्थिक पिळवणूक होते, त्यामुळे कारखान्यांना ऊस तोडणी कामगारांचा पुरवठा ऊसतोडणी महामंडळामार्फतच करावा. तोडणी मशिनने तुटलेल्या उसाला पालापाचोळय़ाची कपात ४.५० टक्याऐवजी १.५० टक्के करण्याची गरज आहे.’

वजन काटय़ाची मागणी मंजूर – आयुक्त गायकवाड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साखर कारखान्यांचे वजन काटे संगणीकृत करून सर्व माहिती ऑनलाइन करावी, ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी प्रशासनाने मान्य केल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.  एकरकमी एफआरपीबाबतचा निर्णय राज्य सरकारच्या पातळीवरील असल्यामुळे या बाबत तूर्त साखर आयुक्तालय हस्तक्षेप करणार नाही, असेही गायकवाड म्हणाले.