पुणे: राज्यातील महाविद्यालयांमध्ये घड्याळी तासिका तत्त्वावर (सीएचबी) प्राध्यापकांचे मानधन आता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. तसेच नियुक्तीसाठी तयार करण्यात आलेल्या कार्यपद्धतीने निश्चित करण्यात आली आहे. कालबद्ध वेळापत्रकानुसार १५ फेब्रुवारी ते १५ जून या कालावधीत नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

हेही वाचा >>> Maharashtra Breaking News Live : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर; राज्यातील इतर घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर…

उच्च व तंत्र शिक्षण विभागाने या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला. नेट, सेट, पीएचडी धारक संघर्ष समितीची विविध मागण्यांबाबत २०२१मध्ये उच्च व तंत्रशिक्षणमंत्र्यांबरोबर बैठक झाली होती. त्यानंतर तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांबाबत उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांच्या अध्यक्षतेखाली समितीची नेमण्यात आली. डॉ. माने समितीने फेब्रुवारी २०२२मध्ये अहवाल सादर केला. या अहवालामध्ये समितीने नऊ शिफारसी केल्या होत्या. त्यातील तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना विद्यापीठ अनुदान आयोगाने निश्चित केलेली पात्रता लागू करणे, तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या नियुक्तीसाठी कार्यपद्धती निश्चित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. तसेच तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात वाढ, नियमित प्राध्यापकांप्रमाणे मानधन थेट बँक खात्यात जमा करणे, शिल्लक कार्यभारावर तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची नियुक्ती करणे या शिफारसी शासनाने मान्य केल्या.

हेही वाचा >>> ३९० महाविद्यालयांनी सुधारणा न केल्यास कारवाई ; पुणे विद्यापीठाची तंबी

तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या नियुक्तीसाठी कालबद्ध वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. त्यानुसार कार्यभार तपासणीसाठी १५ फेब्रवारी, ना-हरकत प्रमाणपत्र मागणी नोंदवण्यासाठी १ मार्चपर्यंत, ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी १५ मार्च, जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी १ एप्रिल, अर्ज तपासणी, मुलाखत, उमेदवार निवडीसाठी १५ एप्रिल, नेमणूक आदेशासाठी ३० एप्रिल, विद्यापीठ मान्यतेसाठी ३१ मेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तर १५ जूनपासून तासिका तत्त्वावरील प्राध्यापकाची सेवा उपलब्ध करून देण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. महाविद्यालयाने प्राध्यापकाची नियुक्ती निश्चित केलेल्या कार्यपद्धतीनुसार झाल्याची खात्री करून वेळेत मानधन दिले जाण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव सहसंचालकांकडे सादर करावा. सहसंचालकांनी प्रस्तावाची पडताळणी करून तासिका तत्त्वावरील प्राध्यापकाचे मानधन महाविद्यालयामार्फत थेट बँक खात्यात जमा करण्याची कार्यवाही करावी. एका पूर्णवेळ रिक्त पदासाठी दोनच तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची नियुक्ती करता येईल. एका प्राध्यापकाकडे जास्तीत जास्त नऊ तासिकांचा कार्यभार सोपवता येईल. उर्वरित कार्यभार किमान नऊ तासिकांचा असल्यास तासिका तत्त्वावरील प्राध्यापकाची नियुक्ती करता येईल.  

हेही वाचा >>> पुण्यातील ४०० किलोमीटर रस्त्यांची नव्याने दुरुस्ती ; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आदेश

या शिफारशींना नकार

तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना सेवेचे अनुभव प्रमाणपत्र देणे, परीक्षांसंबंधित पर्यवेक्षण आणि मूल्यांकनाचे काम देणे,  तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची त्यात महाविद्यालयात पुनर्नियुक्ती करायची असल्यास नव्याने कार्यपद्धती राबवू नये, प्रचलित आरक्षण धोरणानुसार तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची नियुक्ती करणे या शिफारसी नाकारण्यात आल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

आरक्षण लागू नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तासिका तत्त्वावरील नियुक्ती ही शैक्षणिक वर्षापुरती असल्याने पूर्णवेळाची नियुक्ती नाही, महाराष्ट्र लोकसेवा आयोग अधिनियम २००१नुसार तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना आरक्षण लागू असल्याची तरतूद नाही. त्यामुळे तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या नियुक्तीला आरक्षण लागू राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.