अनुर्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास अभ्यासक्रम; जुलै परीक्षेतून १ लाख मुले अकरावी प्रवेशास पात्र

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दहावीच्या गुणपत्रिकेवरील ‘नापास’ किंवा अनुत्तीर्ण हा शेरा आता कायमचा पुसला जाणार असून अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकावर ‘कौशल्य विकास अभ्यासक्रमांसाठी पात्र’ असा शेरा देण्यात येणार आहे. जुलैमध्ये झालेल्या पुनर्परीक्षेच्या गुणपत्रकांवर हे नवे शेरे देण्यात येणार आहेत. या परीक्षेचा निकाल मंगळवारी संकेतस्थळावर जाहीर झाला असून उत्तीर्ण झालेले आणि एटीकेटीची सवलत घेऊन अकरावी प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख १८ हजार आहे.  ३९ हजार ९९४ विद्यार्थी या परीक्षेत सर्व विषयांत उत्तीर्ण झाले आहेत.

दहावीच्या गुणपत्रकावरून यापुढे ‘नापास’, ‘अनुत्तीर्ण’ किंवा ‘फेल’ हे शब्द कायमचे हद्दपार करण्यात आले आहेत. नव्या शेऱ्यांनुसार उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘उत्तीर्ण’ असा शेरा येणार आहे. एक किंवा दोन विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकावर एटीकेटी सवलतीसह अकरावी प्रवेशास पात्र असा शेरा येणार आहे. नियमित परीक्षेत म्हणजे फेब्रुवारीमध्ये पहिल्यांदाच दहावीची परीक्षा देणारे विद्यार्थी दोनपेक्षा अधिक विषयांत अनुत्तीर्ण झाले असतील तर त्यांच्या गुणपत्रकावर ‘पुनर्परीक्षेसाठी पात्र’ असा शेरा येणार आहे. पुनर्परीक्षेत तीनपेक्षा अधिक विषयांमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकावर ‘फक्त कौशल्यविकास अभ्यासक्रमासाठी पात्र’ असा शेरा येणार आहे. या विद्यार्थ्यांना कौशल्य विकास अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळू शकेल मात्र अकरावीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी ते पात्र ठरणार नाहीत. यंदा फेब्रुवारी आणि मार्चमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा १८ जुलै ते ३ ऑगस्ट या दरम्यान झाली. या परीक्षेसाठी राज्यातून १ लाख ४२ हजार ९६८ विद्यार्थी बसले होते. त्यातील ३९ हजार ९९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी २७.९७ आहे. या परीक्षेत ७८ हजार १५३ विद्यार्थ्यांना एटीकेटीची सवलत मिळाली. उत्तीर्ण झालेले आणि एटीकेटी मिळालेले असे १ लाख १८ हजार १४७ विद्यार्थी अकरावीला प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरले आहेत. तीनपेक्षा अधिक विषयांमध्ये अनुत्तीर्ण झाल्यामुळे २४ हजार ३३२ विद्यार्थी हे फक्त कौशल्य विकास अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरले आहेत. या परीक्षेत १४ विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी मिळाली आहे.

बारावीच्या गुणपत्रिका ३ सप्टेंबरला बारावीच्या जुलैमध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल २४ ऑगस्टला संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. या परीक्षेच्या गुणपत्रिका विद्यार्थ्यांना ३ सप्टेंबरला दुपारी ३ वाजता देण्यात येणार आहेत.

नापासचा अर्थ कायम

  • विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकावर नापास किंवा अनुत्तीर्ण असे लिहिले जाणार नाही. मात्र, त्यामुळे ज्या ठिकाणी दहावी उत्तीर्ण अशी पात्रता असेल तेथे गोंधळ होऊ शकतो.
  • त्या पाश्र्वभूमीवर एटीकेटी मिळालेल्या किंवा कौशल्य विकासासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकावर नापास असे लिहिले जाणार नसले तरीही या दोन शेऱ्यांचा अर्थ नापास असाच गृहीत धरण्यात येईल, असे शासनाने स्पष्ट केले आहे.
  • गुणपडताळणीचे अर्ज करण्यासाठी मुदत – ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर
  • उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती मिळण्याचे अर्ज करण्याची मुदत – ३१ ऑगस्ट ते १९ सप्टेंबर
  • निकाल कुठे पाहता येईल – mahresult.nic.in

विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकावरील ‘नापास’ हा शिक्का पुसला जाणार आहे. तीनपेक्षा अधिक विषयांमध्ये अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी कौशल्य विकास सेतू अभ्यासक्रमांसाठी पात्र ठरणार आहेत. एकाही विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर नापास असे यापुढे लिहिले जाणार नाही.

– विनोद तावडे, शिक्षणमंत्री

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Failed remarks exile from 10th marksheet
First published on: 31-08-2016 at 02:35 IST