अधिकाऱ्यांकडून बदलीसाठी पाच लाख रुपये उकळले

लाचखोरीच्या प्रकरणात मंत्रालयातून बडतर्फ करण्यात आलेल्या लिपिकाने पुण्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील सहा अधिकाऱ्यांचे बदली करण्याचे आदेश असणारे बनावट पत्र तयार करून सहा अधिकाऱ्यांना गंडवल्याचे उघडकीस आले आहे. गुन्हे शाखेने पुण्यात शनिवारी लिपिकाला पकडले. त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव आणि स्वाक्षरी असलेले पत्र अधिकाऱ्यांना देऊन त्यांच्याकडून पाच लाख रुपये उकळल्याचे निष्पन्न झाले आहे.

अविनाश हरिचंद्र जाधव ऊर्फ दिलीप हरिचंद्र शिर्के (वय ४७,रा.अनंत अपार्टमेंट, पेंडसेनगर, डोंबिवली पूर्व) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पुण्यातील जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख कार्यालयातील उपसंचालक श्याम दत्तात्रय खामकर (वय ५५, रा. क्वीन्स गार्डन) यांनी या संदर्भात बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिर्के आणि त्याचा साथीदार बुधवारी (१२ एप्रिल) भूमी अभिलेख कार्यालयात आला. त्याने आयुक्त कार्यालयातील स्वीय सहायकाकडे एक पत्र दिले. त्यामध्ये पाच अधिकाऱ्यांचे बदल्याचे आदेश होते. स्वीय सहायकाने हे पत्र न स्वीकारता आयुक्तांना भेटण्याची विनंती शिर्के याला केली. त्या वेळी आम्ही घाईगडबडीत आहोत. हे पत्र स्वीकारावे, असे शिर्के याने सांगितले. त्यामुळे स्वीय सहायकाने हे पत्र स्वीकारले आणि आयुक्तांना दिले.

त्यानंतर गुरुवारी (१३ एप्रिल) भूमी अभिलेख कार्यालयातील दूरध्वनीवर शिर्के याने संपर्क साधला. मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानातील स्वीय सहायक असल्याची बतावणी केली. शिर्के याने बदली आदेशाचे पत्र मिळाले का?, अशी विचारणा केली. या पत्राची भूमी अभिलेख अभिलेख आयुक्तांनी पडताळणी केली. तेव्हा ते बनावट असल्याचे उघडकीस आले. त्यांनी त्वरित पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. पोलीस उपायुक्त पी. आर. पाटील, सहायक आयुक्त सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले-पाटील, सहायक आयुक्त सुनील गवळी आणि पथकाने शिर्के याचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याला शनिवारी रात्री पुण्यात पकडण्यात आले. शिर्के याला लाचखोरीच्या प्रकरणात बडतर्फ करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याने बदलीच्या आमिषाने पाच अधिकाऱ्यांकडून पाच लाख रुपये उकळल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.