पुणे : मंडईजवळील रद्दीच्या दुकानातून घेतलेली पुस्तके एका रात्रीत वाचून काढण्याचा लुटलेला आनंद… पुस्तके वाचनाच्या छंद जोपासताना अकरावी-बारावीला अनुत्तीर्ण होण्यातून कवी म्हणून घडण्यात योगदान देणारे लेखक… कीर्तनकाराच्या कुटुंबामध्ये जन्माला आल्यामुळे साधलेली गोष्ट कथनाची हातोटी… बालपणापासून एकत्र वाढल्याने चार तपांमध्ये खुललेले मैत्र… लोकप्रिय लेखक ‘सुशिं‘च्या स्मृतींना उजाळा देत सुहास शिरवळकर यांच्या आठवणींचे ‘अस्तित्व’ शनिवारी असे दरवळले.
दिलीपराज प्रकाशनाच्या वतीने सुहास शिरवळकर यांच्या ‘अस्तित्व’ या कादंबरीचे आणि ‘सुहास शिरवळकरांच्या कविता’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन प्रसिद्ध कवी-गज़लकार वैभव जोशी आणि अभिनेते सुबोध भावे यांच्या हस्ते झाले. शिरवळकर यांची पत्नी सुगंधा शिरवळकर आणि प्रकाशक राजीव बर्वे मंचावर होते.
जोशी म्हणाले, ‘सुहास शिरवळकर यांच्या लेखणीतून टोकदार उपरोध, सामाजिक जाणिवांविषयी प्रगल्भता पावलोपावली जाणवते. त्यांच्या कवितांमधून अर्थपूर्णता, तत्त्वज्ञान आणि दृश्यात्मकताही दिसून येते. शब्दबंबाळ न होता कुठे थांबायचे हा गुण शिरवळकर यांच्या कवितेत दिसून येतो. माझे व्यक्तिमत्त्व बदलण्याचे काम त्यांच्या कथांमुळे झाले. मी त्यांच्या साहित्यकृतींमधून जगायला शिकलो. शिरवळकर यांच्या लेखनात दृश्यात्मकता असल्याने विविध ठिकाणांचे समग्र दर्शन घडते. माझ्या दृष्टीने शिरवळकर म्हणजे एक ते ५१ क्रमांकावर असलेले एकमेव साहित्यिक आहेत. त्यांच्या लेखनाची ऊब मी सोलापुरात राहूनही घेत राहिलो.’
भावे म्हणाले, ‘मराठी भाषेची आणि वाचनाची गोडी लावणाऱ्या लेखकांमध्ये शिरवळकर होते. स्वत:चा शोध घेण्याची जाणीव, तसेच कल्पकता आणि शोधक नजर त्यांच्या कवितांमध्ये दिसते. शालेय आणि महाविद्यालयीन काळात आम्ही सुहास शिरवळकर यांच्या कथा-कादंबऱ्या नुसत्याच वाचल्या नाहीत, तर त्यांच्या कथांमधील पात्रं जगलो आहोत.’
‘वाङ्मयचोरीचा एकही आरोप नसलेला लेखक म्हणजे सुहास शिरवळकर,’ असा गौरव करून बर्वे यांनी शिरवळकर यांच्याबरोबरच्या मैत्रीचे पदर उलगडले. ‘अभ्यासपूर्ण लेखनातून कथानक गुंफत वाचकांची उत्कंठता वाढवत गुंतवून ठेवणे ही शिरवळकर यांच्या लेखनाची शैली उल्लेखनीय होती,’ असेही त्यांनी सांगितले.
पुस्तकनिर्मितीस साहाय्य करणारे राजीव जोशी, अजित सातभाई, श्रीनिवास भणगे यांचा सत्कार सुगंधा शिरवळकर यांच्या हस्ते करण्यात आला. प्रबोध शिरवळकर यांनी प्रास्ताविक केले. सम्राट शिरवळकर यांनी आभार मानले. मधुर बर्वे यांनी सूत्रसंचालन केले.
सुहास शिरवळकर यांच्या लेखणीतून टोकदार उपरोध, सामाजिक जाणिवांविषयी प्रगल्भता पावलोपावली जाणवते. त्यांच्या लेखनात दृश्यात्मकता असल्याने विविध ठिकाणांचे समग्र दर्शन घडते. – वैभव जोशी, प्रसिद्ध कवी-गीतकार