मावळ गोळीबाराला सहा वर्षे पूर्ण; विरोधावर अद्याप तोडगा नाहीच
मावळात असलेल्या पवना धरणातून पिंपरी-चिंचवडसाठी बंद नळयोजनेद्वारे पाणी आणण्याच्या बहुचर्चित प्रकल्पास मावळ गोळीबाराच्या घटनेनंतर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली. आरोप-प्रत्यारोपांचे सत्र, राष्ट्रवादी व भाजपचे राजकारण आणि टक्केवारीचे अर्थकारण अशा कारणांमुळे सहा वर्षांनंतरही नियोजित काम बंदच आहे. पिंपरीचे ‘कारभारी’ अजित पवार या योजनेसाठी कमालीचे आग्रही आहेत. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या माध्यमातून प्रकल्प मार्गी लावण्याचे त्यांचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. तथापि, मावळातील शेतक ऱ्यांसह भाजप आमदाराचाच विरोध असल्याने निर्माण झालेला पेच कायम आहे. मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात चेंडू असल्याने सर्वाच्या नजरा त्यांच्या निर्णयाकडे लागल्या आहेत.
पवना बंदनळ योजना म्हणजे मावळस्थित पवना धरणातून ३५ किलोमीटर दूर असलेल्या पिंपरी पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी आणण्याची योजना आहे. अशाप्रकारे पिंपरी-चिंचवडला पाणी देण्यास मावळातील शेतक ऱ्यांचा तीव्र विरोध आहे. त्याला अनेक कारणे आहेत. हा विरोध व्यक्त करण्यासाठी ९ ऑगस्ट २०११ ला बऊर येथे आंदोलन झाले, त्यास हिंसक वळण लागले. शेतक ऱ्यांनी पोलिसांना बेदम मारहाण केली. तर, पोलिसांनी शेतकऱ्यांवर गोळीबार केला. त्यात तीन शेतकरी मृत्युमुखी पडले, त्याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले. या घटनेचा परिणाम म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकल्पाच्या कामास स्थगिती दिली. तेव्हापासून थांबलेले काम सहा वर्षांनंतरही सुरू होऊ शकलेले नाही.
दरम्यानच्या काळात अनेक घडामोडी झाल्या. मात्र, परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. अजित पवार या प्रकल्पासाठी आग्रही आहेत. मात्र, मावळातील शेतकरी व भाजप नेत्यांचा विरोध कायम आहे. पालकमंत्री व अजितदादांच्या उपस्थितीत मुंबईत नुकतीच बैठक झाली. सविस्तर चर्चा झाली, मात्र तोडगा निघाला नाही. पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाविषयी दोन वेळा चर्चा झाली, तेव्हा १५ दिवसात बैठक लावू, अशी ग्वाही त्यांनी दिली. अद्याप बैठकीची चिन्हे नाहीत. सध्या मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात चेंडू आहे. त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

आरोप-प्रत्यारोप
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेत असताना, हा प्रकल्प सुरू करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. आता पालकमंत्री गिरीश बापट यांच्या माध्यमातून याबाबतचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न अजित पवार करत आहेत. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक आमदार बाळा भेगडे तीव्र विरोधात आहेत. िपपरी पालिकेकडून प्रकल्पासंदर्भात कोणतीही हालचाल सुरू झाली की मावळातून विरोध सुरू होतो. अजित पवार यांनी नुकतेच थेरगावच्या कार्यक्रमात बोलताना, राज्यसरकार राज्यभरात बंदनळ योजना राबवण्याची भाषा करते. पण मावळात त्यांचेच आमदार विरोध करतात, असे सांगून भाजपचा दुतोंडीपणा उघड केला होता.

बंद नळाचे ‘अर्थकारण’
* पवना बंद नळ योजना मूळ २२३ कोटींची होती. ३३१ कोटींची (२१ टक्के जादा दराची) निविदा मंजूर झाल्याने सुरूवातीलाच खर्चाचा आकडा ४०० कोटींवर गेला.
* ३० एप्रिल २००८ ला कामाचे आदेश झाले. मात्र, विरोधामुळे काम सुरू होऊ शकले नाही.
* ९ ऑगस्ट २०११ मध्ये बऊर येथे झालेल्या गोळीबारामुळे प्रकल्पाचे काम बंद पडले.
* जागा नसतानाही निविदा काढून मर्जितील ठेकेदाराला काम देण्यात आले. त्याला तब्बल १४२ कोटी रूपये त्याला आगावू देण्यात आले.
* काम रखडले असताना ठेकेदार पालिकेकडे भरपाईची मागणी करत होता आणि त्याचे ‘लाभार्थी’ नेते त्यासाठी प्रयत्नशील होते.