‘फॅशन शो’ म्हटले की बार्बी बाहुलीसारख्या अंगयष्टीच्या मुली डोळ्यासमोर येतात. आधी प्रचंड लठ्ठ असलेल्या आणि त्या लठ्ठपणातून प्रयत्नपूर्वक बाहेर आलेल्या व्यक्तींचा फॅशन शो अशी कल्पना केलीय कधी?.. पुण्यात असा एक फॅशन शो येत्या रविवारी होणार आहे.
बॅरिअॅट्रिक शल्यविशारद डॉ. जयश्री तोडकर यांनी व्यवसायाची १० वर्षे पूर्ण केल्यानिमित्त त्यांच्या काही रुग्णांनी या फॅशन शोचे आयोजन केले असून लठ्ठपणा कमी करण्यासाठीची शस्त्रक्रिया करून घेतलेले किंवा शस्त्रक्रियेविनाही लठ्ठपणा कमी केलेल्या ६० ते ६५ व्यक्ती या वेळी आपले आवडते कपडे घालून ‘रँप’वर चालणार आहेत.
व्यवसायाने फिजिओथेरपिस्ट असलेल्या आणि या फॅशन शोमध्ये भाग घेणाऱ्या शुभांगी खानविलकर म्हणाल्या, ‘‘सहा महिन्यांपूर्वी माझे वजन १२७ किलो होते. शस्त्रक्रियेनंतर ते ९२ वर आले आहे. पूर्वी माझ्या मापाचे कपडे कुठल्याच दुकानात मिळत नसल्यामुळे मला कपडे नेहमी शिवूनच घ्यावे लागत. आता मी खास फॅशन शोसाठी ‘अनारकली’ विकत घेतला आणि मला तो सहजतेने मिळालाही. खूप लठ्ठ असताना अशा प्रकारे रँपवर चालण्याची हिम्मतच नव्हती, खूप निराश वाटायचे. पण आता मी रँपवर चालू शकते. लठ्ठपणामुळे मला फिजिओथेरपीचा व्यवसायही बाजूला ठेवावा लागला होता. तो देखील आता पुन्हा सुरू करणार आहे.’’
या फॅशन शोमध्ये स्त्रियांबरोबर पुरूषही सहभागी होणार असून रँपवॉकनंतर काही निवडक व्यक्ती आपले लठ्ठपणातून बाहेर येतानाचे अनुभव सांगतील, असे डॉ. तोडकर यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, ‘‘अनेकदा लठ्ठपणा कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करूनही काही जणांना यश येत नाही. तेव्हा रुग्णांना खूप नैराश्य आणि विफलता येते. अशा व्यक्तींना या फॅशन शोमधून प्रेरणा मिळू शकेल. लठ्ठपणा कमी केलेल्या रुग्णांसाठी आम्ही दर महिन्याला मदत गटाचे सत्र घेतो. या सत्रात त्यांना कमी केलेले वजन कसे टिकवावे याविषयी माहिती दिली जाते. कुणी किती किलो वजन घटवले, किती इंच चरबी कमी झाली अशीही चर्चा या वेळी रुग्णांमध्ये होते. अशाच एका सत्रात काही रुग्णांनी फॅशन शोची कल्पना मांडली. तुम्हाला जे कपडे आवडतील ते घालून या, असे रुग्णांना सांगितले आहे. काही रुग्ण पारंपरिक तर काही पाश्चात्त्य पद्धतीची वेशभूषा करून येतील.’’