पुणे : डेक्कन जिमखाना भागातील गुडलक कॅफेत एका ग्राहकाला देण्यात आलेल्या बन मस्कात काचेचे तुकडे आढळल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून (एफडीए) शनिवारी तपासणी करण्यात आली. त्यानंतर गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरत्या स्वरूपात निलंबित करण्यात आल्याची माहिती ‘एफडीए’च्या अधिकाऱ्यांनी दिली.
डेक्कन जिमखाना भागातील गुडलक कॅफेत एक दाम्पत्य नाश्ता करण्यासाठी आले होते. त्या वेळी त्यांना देण्यात आलेल्या बन मस्कात काचेचे तुकडे आढळून आले. दाम्पत्याने याबाबतची चित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित केली होती. त्यानंतर दाम्पत्याने एफडीएकडे ऑनलाइन तक्रार दिली होती.
‘गुडलक कॅफेची तपासणी करण्यात आली. त्यानंतर गुडलक हाॅटेलचा खाद्यपदार्थविक्री परवाना तात्पुरत्या स्वरूपात निलंबित करण्यात आला. तपासणीत आढळून आलेल्या त्रुटी दूर होईपर्यंत परवाना निलंबित राहणार आहे,’ असे ‘एफडीए’चे सहआयुक्त सुरेश अन्नपुरे यांनी सांगितले.
चौकट लष्कर भागातील भिवंडी दरबार हाॅटेलमध्ये एका महिलेला दिलेल्या सूपमध्ये झुरळ आढळले होते. संबंधित हाॅटेलची तपासणी करण्यात आली होती. एफडीएने दिलेल्या अहवालानंतर भिवंडी दरबार हाॅटेलच्या मालकासह व्यवस्थापकाविरुद्ध लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ‘भिवंडी दरबार हाॅटेलचा परवाना रद्द करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. दोन्ही हाॅटेलमधील खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत,’ असे सुरेश अन्नपुरे यांनी नमूद केले.