आगामी महापालिका निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाकडून शुक्रवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली. शहरातील किमान ३२ प्रभागात सुधारणा करण्यात आल्याचा दावा महापालिकेच्या निवडणूक शाखेकडून करण्यात आला.
इतर मागासवर्गीय समाजाच्या (ओबीसी) राजकीय आरक्षणा शिवाय निवडणुका घ्याव्यात आणि दोन आठवड्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. तत्पूर्वी महापालिकेने प्रारूप प्रभाग रचना आराखडा प्रसिद्ध करून त्यावरील हरकती सूचनांची कार्यवाही १० मार्च रोजी पूर्णकेली होती. त्याचा अहवाल राज्य शासनाला पाठविण्यात आला होता. त्याचे सादरीकरण आयुक्तांनी गेल्या मंगळवारीकेले होते. त्याला निवडणूक आयोगाने मान्यतादिली. त्यानुसार अंतिम प्रभागरचना जाहीर करण्यात आली.
आगामी निवडणूक त्रिसदस्यीय प्रभाग (तीन नगरसेवकांचा एक प्रभाग) या पद्धतीने होणार आहे. त्यानुसार शहरात ५८ प्रभागातून १७३ नगरसेवक निवडून येणार आहेत. यातील ५७ प्रभाग तीन नगरसेवकांचे तर एक प्रभाग दोन नगरसेवकांचा असेल.
निवडणुकीसाठीचा प्रभागर रचनेचा अंतिम आराखडा जाहीर झाला आहे. येत्या काही दिवसात आरक्षण सोडत जाहीर होईल.– डॉ. यशवंत माने, निवडणूक शाखा प्रमुख