पिंपरी : आगामी निवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप प्रभागरचनेवर आलेल्या ३१८ हरकती व सूचनांवरील शिफारशी विचारात घेऊन अंतिम प्रभागरचना तयार केली. ही अंतिम रचना महापालिकेने राज्य शासनाकडे सादर केली. राज्य निवडणूक आयोगाने अंतिम प्रभागरचनेला मान्यता दिल्यानंतरच किती हरकती व सूचना स्वीकारल्या आहेत, हे स्पष्ट होईल, असे महापालिका आयुक्त, निवडणूक अधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले.
महापालिकेने २२ ऑगस्टला चार सदस्यीय पद्धतीने ३२ प्रभागांची प्रारूप रचना जाहीर केली होती. या प्रभागरचनेवर ३१८ हरकती आल्या होत्या. त्यामध्ये माेरवाडी, शाहूनगर, संभाजीनगर या प्रभागाच्या रचनेवर सर्वाधिक म्हणजे ११५, त्याखालोखाल प्रभाग क्रमांक एक चिखली गावठाण, माेरेवस्ती या प्रभागाबाबत ९८ आणि महेशनगर, संत तुकारामनगर व वल्लभनगर प्रभागाबाबत ३१ हरकती आल्या होत्या. ३१८ हरकतींवर राज्याचे सहकार आणि विपणन विभागाचे प्रधान प्रवीण दराडे यांनी १० सप्टेंबर रोजी सुनावणी घेतली. एकाचदिवशी सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाली होती.
हरकती व सूचनांवरील शिफारशी विचारात घेऊन प्राधिकृत अधिकाऱ्यांनी प्रभागरचना अंतिम केली. १३ ते १५ सप्टेंबरदरम्यान महापालिका आयुक्तांमार्फत नगरविकास विभागाला प्रभागरचना सादर करावी लागणार होती. त्यानुसार अंतिम प्रभागरचना राज्य शासनाच्या नगरविकास विभागाला सादर केली. कोणत्या प्रभागातील किती हरकती स्वीकारल्या आहेत, याची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून रचनेला मान्यता मिळाल्यानंतर स्पष्ट होईल, असे आयुक्त सिंह यांनी सांगितले. त्यामुळे अंतिम प्रभागरचनेनंतरच प्राधिकृत अधिकाऱ्यांनी किती हरकती स्वीकारल्या आहेत, प्रभागरचना बदलली आहे का, हे समजणार आहे.
हरकतींबाबत माहिती देण्यास टाळाटाळ
हरकती व सूचनांवरील शिफारशी विचारात घेऊन प्राधिकृत अधिकाऱ्यांनी प्रभागरचना अंतिम केली. ही रचना महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यामार्फत राज्य शासनाला सादर केली. मात्र, हरकती किती स्वीकारल्या याची माहिती आयुक्तांना नाही. आयोगाने मान्यता दिल्यानंतरच किती हरकती स्वीकारल्या हे कळेल, असे सांगत प्रशासनाने हरकतींची माहिती देण्यास टाळाटाळ केली.
ऑक्टोबरमध्ये अंतिम प्रभाग रचना
महापालिकेने सादर केलेली अंतिम प्रभाग रचना राज्य शासन २२ सप्टेंबरपर्यंत राज्य निवडणूक आयोगाला सादर करणार आहे. आयोगाच्या मान्यतेनंतर तीन ते सहा ऑक्टोबर २०२५ दरम्यान अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध केली जाणार आहे.
अंतिम प्रभागरचना राज्य शासनाला सादर केली आहे. किती हरकती स्वीकारल्या याची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून रचनेला मान्यता मिळाल्यानंतर स्पष्ट होणार आहे, असे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.
हरकती, सूचनांचा विचार करूनच अंतिम प्रभागरचना केली आहे. त्यामुळे किती हरकती स्वीकारल्या याची माहिती देणे अपेक्षित आहे. स्वच्छ, पारदर्शकपणे निवडणुकीची प्रक्रिया राबविली जात नाही. निवडणूक अधिकारी सत्ताधारी आमदारांना भेटून त्यांच्या सोयीची रचना करत आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केला आहे.